'आता मी कंटाळलो आहे'; कर्जबाजारी रिक्षाचालकाने केली आत्महत्या, अंतिम इच्छेनुसार पत्नीने दिला अग्निडाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 02:43 PM2021-05-22T14:43:54+5:302021-05-22T14:45:52+5:30
माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये. माझ्या पार्थिवाला पत्नीने अग्निडाग द्यावा, अशी इच्छा नमूद केली.
औरंगाबाद : कर्जाचे हप्ते फेडू शकत नसल्यामुळे एका रिक्षाचालक तरुणाने गुरुवारी मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली; पण आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत त्याच्या पार्थिवाला पत्नीने अग्निडाग द्यावा, अशी इच्छा व्यक्त केली. तरुणाच्या इच्छेनुसार जड अंत:करणाने पत्नीने पतीच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.
भीमराव राघू साबळे (२७, रा. राजीवनगर झोपडपट्टी), असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, भीमराव हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत. लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता. यामुळे त्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते ते फेडू शकत नव्हते. यामुळे आलेल्या नैराश्यातून रात्री ते अचानक पत्नीची साडी घेऊन रेल्वेस्टेशन पुलाच्या जवळील रेल्वे रुळाच्या दिशेने चालत गेले. तेथे एका झाडाला त्यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रात्री १२ वाजेच्या सुमारास पुलाखाली राहणाऱ्या लोकांना दिसली. यानंतर नातेवाइकांनी त्यांना घाटीत दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याविषयी सातारा ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
सुसाइड नोटमध्ये इच्छा
मयत साबळे यांच्या खिशात पोलिसांना सुसाइड नोट सापडली. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद झाला. यामुळे कर्जाचे हप्ते फेडता येत नाहीत. आता मी कंटाळलो आहे. माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये. माझ्या पार्थिवाला पत्नीने अग्निडाग द्यावा, अशी इच्छा नमूद केली.
बनेवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार
साबळे आत्महत्येचा त्यांच्या पत्नीला जबर मानसिक धक्का बसला. त्या सारख्या रडत होत्या. असे असताना नातेवाइकांनी त्यांना सोबत घेऊन साबळे यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. सर्व विधी पार पाडल्याचे सूत्राने सांगितले.