शेतकऱ्याची फसवणूक करणारा जेरबंद
By Admin | Published: March 31, 2017 12:02 AM2017-03-31T00:02:48+5:302017-03-31T00:07:37+5:30
उस्मानाबाद : शासकीय विहीर मंजूर झाल्याचे सांगून एका शेतकऱ्यांकडून १६ हजार रूपये घेऊन फसवणूक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले़
उस्मानाबाद : शासकीय विहीर मंजूर झाल्याचे सांगून एका शेतकऱ्यांकडून १६ हजार रूपये घेऊन फसवणूक करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले़ ही कारवाई ३० मार्च रोजी दुपारी करण्यात आली असून, आरोपीकडून एक दुचाकी व मोबाईलही जप्त करण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर शहरातील विश्वासनगर भागातील राजाराम मारुती कानडे यांच्या घरी २५ मार्च रोजी दोन इसम दुचाकीवरून आले होते़ ‘आम्ही पंचायत समितीतून आलो आहोत़ तुम्हाला शासकीय विहीर मंजूर असून, त्याचे अडीच लाख रूपये मिळणार आहेत़’ असे त्यांनी कानडे यांना सांगितले़ तसेच फाईल पंचायत समितीत दाखल करण्यासाठी अॅडव्हान्स १६ हजार रूपये भरावे लागतील, असे सांगून रक्कम त्यांच्याकडून नेली़ त्यांनी पुन्हा मोबाईलवर फोन करून आणखी ११ हजार रूपये लागतील, अशी मागणी केली़ त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे कानडे यांच्या लक्षात आले़ त्यानंतर त्यांनी २९ मार्च रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात संबंधित इसमांविरूध्द फिर्याद दिली होती़ या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी फिर्यादीकडून आरोपीचे वर्णन माहिती करून घेतले़ त्यानंतर पोलिसांनी संशयित अमित रामा झेंडे (रा़ काकानगर, उस्मानाबाद) याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखविल्या़ त्यावेळी झेंडे याने कानडे यांची फसवणूक केल्याची माहिती दिली़ पोलिसांनी झेंडे याच्याकडून रोख १५ हजार ५०० रूपये, एक दुचाकी व एक मोबाईल जप्त केला़ झेंडे याला पुढील कार्यवाहीसाठी तुळजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे़ ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक दिपाली घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि हरिष खेडकर, पोहे कुलकर्णी, हबीब, पोना मुल्ला, पोशि अमोल पवार यांच्या पथकाने केली़