विद्यापीठाच्या पदव्युत्तर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 12:34 AM2018-01-03T00:34:11+5:302018-01-03T00:34:14+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात उमटल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने मंगळवारच्या सर्व परीक्षा रद्द केल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रथम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. भीमा-कोरेगाव येथील घटनेचे पडसाद विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात उमटल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने मंगळवारच्या सर्व परीक्षा रद्द केल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली.
भीमा-कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावाचे वातावरण असल्यामुळे प्रभारी पोलीस आयुक्तांनी डॉ. पांडे यांच्याशी सकाळीच संपर्क साधत खबरदारीचा उपाय म्हणून विविध महाविद्यालयांमध्ये सुरू असलेल्या परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. यावर परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके, डॉ. पांडे यांच्या संयुक्त बैठकीत सर्व प्रकारच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना देण्यात आली. याचवेळी सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी सकाळी ११ वाजता विद्यापीठातील मुख्य इमारत, परीक्षा भवन, ग्रंथालयासह विविध विभागांमध्ये जात भीमा-कोरेगावच्या निषेधार्थ बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनीही कोणाताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विद्यापीठ बंद ठेवण्याचे लेखी आदेश सर्व यंत्रणांना दिले. वनस्पतीशास्त्र विभाग बंद करण्यात आला होता; मात्र विभागात काही संशोधक विद्यार्थी काम करीत बसलेले दिसल्यामुळे जमावातील काही जणांनी विभागावर दगडफेक केल्याची घटनाही घडली. यानंतर सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर निषेध सभा घेतली. या सभेत एसएफआयचे अॅड. सुनील राठोड, सम्यक विद्यार्थी आघाडीचे प्रकाश इंगळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे दीपक बहिर आदींनी संबोधित करत भीमा-कोरेगाव परिसरात झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला, तसेच समाजात फूट पाडणाºया शक्तींविरोधात एकत्रितपणे लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
शाळा, महाविद्यालये कडकडीत बंद
शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळच्या सत्रातील शाळा सुरू झाल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले, तर महाविद्यालयांमध्येही शैक्षणिक बंद पाळण्यात आला. शहरातील नागसेनवनातील मिलिंद कला, विज्ञान, पीईएस अभियांत्रिकी, विधि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळत भीमा-कोरेगावच्या घटनेचा निषेध व्यक्त केला.
याशिवाय शहरातील स. भु. शिक्षण संस्था, विवेकानंद महाविद्यालय, देवगिरी कॅम्पस, शासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माण, तंत्रनिकेतन, अध्यापक महाविद्यालयामध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. याशिवाय वसंतराव नाईक महाविद्यालय, शिवछत्रपती महाविद्यालय याठिकाणीही बंद पाळण्यात आला. हीच परिस्थिती शाळांमध्ये होती. सकाळच्या सत्रात भरलेल्या शाळा ११ वाजेच्या सुमारास सोडून देण्यात आल्या. अनेक शाळांमध्ये मुलांना घेऊन जाण्यासाठी पालकांची तारांबळ उडाली होती; मात्र शाळा-महाविद्यालयांमध्ये कोठेही अनुचित प्रकार घडलेला नाही.