मातृभाषेतून उच्चशिक्षणाचा निर्णय देशाच्या प्रगतीसाठी क्रांतीकारी : डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:46 PM2021-06-25T16:46:07+5:302021-06-25T17:04:11+5:30

""Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university convocation ceremony 2021 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच दीक्षांत समारंभ ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला.

The decision of higher education through mother tongue is revolutionary for the progress of the country: Dr. Anil Sahastrabuddhe | मातृभाषेतून उच्चशिक्षणाचा निर्णय देशाच्या प्रगतीसाठी क्रांतीकारी : डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे

मातृभाषेतून उच्चशिक्षणाचा निर्णय देशाच्या प्रगतीसाठी क्रांतीकारी : डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे

googlenewsNext
ठळक मुद्देनवीन शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थी केंद्रीत असून देशाच्या शैक्षणिक पाया बळकट करणारे आहे.पुर्वीच्या काळापासून भारतात प्रादेशिक व स्थानिक भाषेतून प्राथमिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे.समाज माध्यमे व माहिती तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांनी टेक्नोसॅव्ही होऊन स्वत:सोबतच समाज व देशाचा विकास साधावा

औरंगाबाद : नवीन शैक्षणिक धोरणात उच्च व तंत्रशिक्षण तसेच वैद्यकीय व व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण मातृभाषेतून देण्याचा निर्णय देशाच्या प्रगतीसाठी क्रांतीकारक ठरेल, असा विश्वास ‘एआयसीटीई‘चे अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केला. देशात पाच प्रादेशिक भाषेत १४ तंत्रशिक्षण संस्थामध्ये यंदापासून हा प्रयोग राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी घोषित केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच दीक्षांत समारंभ ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला. मा.कुलपती तथा राज्यपाल मा.भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.२५) हा कार्यक्रम झाला. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे हे यंदाचे दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.उदय सामंत, कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे म्हणाले,  नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे विद्यार्थी केंद्रीत असून देशाच्या शैक्षणिक पाया बळकट करणारे आहे. पुर्वीच्या काळापासून भारतात प्रादेशिक व स्थानिक भाषेतून प्राथमिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. आता नव्या धोरणात ज्ञानव्यवस्था, आंतर विद्याशाखीय दृष्टीकोन व नवोन्मेष आदींनी प्राधान्य देण्यात आले आहे. या धोरणामुळे देशाच्या शेक्षणिक विकासात अमुलाग्र बदल होऊन उद्योजकीय कौशल्ये विकसीत होणार आहेत. समाज माध्यमे व माहिती तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांनी टेक्नोसॅव्ही होऊन स्वत:सोबतच समाज व देशाचा विकास साधावा, असे आवाहनही डॉ.सहस्त्रबुध्दे यांनी केले. मराठी, हिंदी, तामिळ, तेलगू व बंगाली या पाच भाषांमधून १४ तंत्रशिक्षण संस्थेत व्यावसायिक शिक्षण यंदापासून सुरु होत असल्याचे यावेळी डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी घोषित केले. 

युवकचं समाजाचे 'रोल मॉडेल' : कुलपती
तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणा-या भारतात विद्यार्थी, संशोधकांकडून खुप अपेक्षा आहेत. समाजाचे ‘रोल मॉडेल‘ म्हणून पुढे येत असतांना तरुणांनी आपले आचरण उत्तम ठेवावे, असे आवाहन कुलपती तथा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घोषित केले. सुमारे वीस मिनिटांच्या भाषणात त्यांनी गुरुकुल पध्दतीपासून ते आजपर्यंत उच्च शिक्षण क्षेत्रात झालेले बदल याचा आढावा घेतला.

बांधीलकी जपून विद्यापीठाचा नावलौकिक उंचावणार : कुलगुरु 
'एनआयआरएफ' रँकिंगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास ६९ वे स्थान मिळाल्याने पहिल्या शंभर मध्ये स्थान मिळणारे महाराष्ट्रातील हे दुसरे विद्यापीठ ठरले. गेल्या दीड वर्षात उद्भवलेल्या या संकटामध्ये विद्यापीठांनी सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम राबविले. दोन‘कोविड टेस्टिंग लॅब’, व्हायरालॉजी हा अभ्यासक्रम राबविण्यात आला. सोबतच विद्यापीठाच्या वतीने आजपर्यंत मुख्यमंत्री सहायता निधीत ८१ लाखांचा निधी जमा करण्यात आला.पदवी सोबतच विद्यार्थ्यांना स्वंयरोजगारांसाठी विद्यार्थ्यांनी काही कौशल्ये प्राप्त केले पाहिजेत. यासाठी विविध उद्योजकांशी संवाद साधून व्यवसाय व शिक्षण यांच्यात समन्वय ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. युवकांच्या स्वप्नांना क्षितिजापार झेपावण्यासाठी गरुड पंखांचे बळ त्यांच्यात आहे, असेही ते म्हणाले. 

प्राध्यापक भरतीचा निर्णय आठ दिवसात : उदय सामंत
राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांची भरती सुरु करावी, अशी भुमिका कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी मनोगतात मांडली. हा संदर्भ देत येत्या आठ दिवसात शासन आदेश (जीआर) निघेल, असे यावेळी मा.ना.उदय सामंत यांनी घोषित केले. तसेच शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मराठीतून शिक्षण देण्याचा निर्णय प्रस्तावित आहे, असेही मा.ना.उदय सामंत म्हणाले.

विद्यापीठाचा ‘कोविड-१९‘ काळातील कामगिरीचा गौरव
‘कोविड-१९‘ च्या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा वि़द्यापीठाने केलेल्या कामगिरीचा मा.कुलपती तथा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मा.ना.उदय सामंत व डॉ.अनिल सहस्त्रबुध्दे या तिघांनी ही गौरव केला. दोन कोविड टेस्टिंग लॅब सुरु करणारे राज्यातील एकमेव विद्यापीठ असल्याचेही ते म्हणाले.

सोशल मीडियातून लाईव्ह झाला सोहळा
डॉ. हमीद खान व डॉ.अपर्णा अष्टपुत्रे यांनी सूत्रसंचालन केले.‘राजभवना‘च्या प्रोटोकॉल नूसार सदर सोहळा अत्यंत शिस्तबध्द व प्रोफेशनल पध्दतीने कार्यक्रम पार पडला. सोहळयाच्या नियोजनासाठी विविध १४ समित्यांची स्थापना करण्यात आली होती. सोहळयाचे संकेतस्थळ व फेसबुक पेजवरुन लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. सोहळ्यास प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.चेतना सोनकांबळे, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.धनश्री महाजन, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील आदींची उपस्थिती होती. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे, प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख, डॉ.हरिदास विधाते, डॉ.फुलचंद सलामपुरे, डॉ.राजेश करपे, डॉ.सचिन देशमुख, डॉ.राहुल म्हस्के, डॉ.विलास खंदारे, डॉ.प्रतिभा अहिरे, राजेंद्र मडके आदींची उपस्थिती होती.

४२२ संशोधकांना पीएचडी प्रदान
यावेळी संशोधकांच्या पीएच.डीचे वितरण प्रत्यक्ष न घेता ऑनलाईन पध्दतीने नाववाचन करण्यात आले. या समारंभात ४२२ संशोधकांना पीएचडी प्रदान करण्यात आली. यामध्ये कला व सामाजिकशास्त्रे -१७४, विज्ञान व तंत्रज्ञान -१२७, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र - ५८  तसेच आंतरविद्या शाखेच्या -६३ संशोधकांचा समावेश आहे. या कार्यक्रमात एकुण ८१ हजार ७३६ पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात आले. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान - ३८ हजार ५४१, मानव्यविद्या - २० हजार ३९२, वाणिज्य शास्त्र - १७ हजार ५९३, आंतर विद्या शाखेच्या ४ हजार २१० जणांचा समावेश आहे. 

Web Title: The decision of higher education through mother tongue is revolutionary for the progress of the country: Dr. Anil Sahastrabuddhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.