भापकरांच्या अहवालानंतरच कटके यांच्या तक्रारीवर निर्णय; औरंगाबाद पोलीस आयुक्तांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:22 PM2018-01-23T13:22:21+5:302018-01-23T13:25:05+5:30
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याविरुद्ध निलंबित उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीसंदर्भात विभागीय आयुक्तांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कटके यांच्या तक्रारींवर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी दिली.
औरंगाबाद : विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याविरुद्ध निलंबित उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीसंदर्भात विभागीय आयुक्तांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कटके यांच्या तक्रारींवर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
जमीन विक्रीची परवानगी देताना अनियमितता केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी पंधरा दिवसांपूर्वी सिटीचौक ठाण्यात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी एक कोटींची लाच मागितली आणि जातीवाद केल्याचा आरोप करणारा तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या तक्रार अर्जावर पुढील कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विधिज्ञांकडून कायदेशीर मार्गदर्शन मागविले आहे.
याविषयी पत्रकारांनी पोलीस आयुक्तांना विचारले असता ते म्हणाले की, कटके यांनी विभागीय आयुक्तांविरुद्ध केलेल्या आरोपामध्ये तथ्य आहे अथवा नाही, याबाबत आम्ही शहानिशा करीत आहोत. लाच मागितल्याचा आणि जातीवाद केल्याचा कोणताही पुरावा अद्याप आम्हाला मिळाला नाही. असे असले तरी आम्ही भापकर यांनी कटके यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. ही कारवाई करण्याचे अधिकार त्यांना आहेत अथवा नाही, शिवाय त्यांनी केलेली कारवाई कशाच्या आधारे केली, याबाबतचा अहवाल आम्ही मागविला आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तक्रारीत तथ्य आहे अथवा नाही, हे समोर येईल आणि कारवाईची दिशा ठरेल.