नोटाबंदीचा निर्णय ऐतिहासिक
By Admin | Published: January 16, 2017 12:54 AM2017-01-16T00:54:49+5:302017-01-16T00:55:33+5:30
लातूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
लातूर : काळ्या पैशाला धक्का दिला पाहिजे, अशी चर्चा दर चार वर्षांनी केली जायची. पण हे शिव-भीमधनुष्य पेलण्याची ताकद केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविली. पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे आपत्कालीन गैरसोय होईल, पण दीर्घकालीन उपयुक्त आहे, असे मत अर्थतज्ज्ञ खा.डॉ. नरेंद्र जाधव यांनी येथे रविवारी व्यक्त केले.
श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेच्या वतीने एसएमआर स्वीमिंग पूल येथे ‘विमुद्रीकरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार होते. मंचावर संस्थेचे मार्गदर्शक अजय ठक्कर, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, धर्मराज हल्लाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, पाचशे-हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्यापूर्वी भारताची अर्थव्यवस्था वेगवान होती. विकासाचा दर ७.५ टक्के होता. याचा अर्थ सर्वकाही अलबेल आहे, असा होत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. ज्या प्रमाणे रोजगार निर्मिती व्हायला हवी होती, ती झाली नाही. केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर गैरसोयींबाबत चर्चा झाली. मात्र दीर्घकालीन उपयुक्ततेबद्दल बोलले जात नाही. गैरसोयीचा गैरसमज वाढवून सांगितला. पण उपयुक्तता सांगितली नाही, अशी खंतही डॉ. जाधव यांनी व्यक्त केली. या निर्णयामागे बनावट नोटा व काळ्या पैशाला दणका देणे हा हेतू आहे. बनावट नोटांचा उपयोग करून दहशतवाद्यांनी आतापर्यंत ३५ हजार भारतीयांचा बळी घेतला आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार बळींची संख्या अत्यंत नगण्य आहे, म्हणून तुम्ही समर्थन करणार का? असा सवालही खा.डॉ. जाधव यांनी उपस्थित केला.
सूत्रसंचालन डॉ. गणेश बेळंबे यांनी केले, तर संस्थेचे अध्यक्ष हणमंत जगताप यांनी आभार मानले.