जनहिताचा निर्णय व्हावा; दुकाने उघडण्यास परवानगी मिळण्याची व्यापाऱ्यांना आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 04:12 PM2020-05-30T16:12:17+5:302020-05-30T16:15:40+5:30

दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येईल व १ जूनपासून व्यवहार सुरू होतील, अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

The decision should be in the public interest; Traders hope to get permission to open shops | जनहिताचा निर्णय व्हावा; दुकाने उघडण्यास परवानगी मिळण्याची व्यापाऱ्यांना आशा

जनहिताचा निर्णय व्हावा; दुकाने उघडण्यास परवानगी मिळण्याची व्यापाऱ्यांना आशा

googlenewsNext
ठळक मुद्देकिराणापेक्षा इतर दुकानांत गर्दी असते कमी७० दिवसांपासून व्यवसायावर परिणाम

औरंगाबाद : लॉकडाऊन सुरू होऊन ७० दिवस पूर्ण झाले. व्यापाऱ्यांची संपूर्ण आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर आता दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात येईल व १ जूनपासून व्यवहार सुरू होतील, अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

दुकाने सुरू करण्यासाठी गांभीर्याने विचार करावा
तब्बल ७० दिवसांपासून दुकाने बंद आहेत. आणखी किती दिवस दुकाने बंद ठेवणार आहेत. चौथा लॉकडाऊन संपत आहे. १ जूनपासून लॉकडाऊन शिथिल करून सर्व दुकाने काही तास उघडण्याची परवानगी प्रशासनाने द्यावी. कोरोनाचा विळखा किती दिवस राहील, हे कोणीच सांगू शकत नाही. यामुळे दुकाने उघडणे हितकारक राहील. मागील ७० दिवसांत व्यवसायाची साखळी संपूर्णपणे खंडित झाली आहे.  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करणे महत्त्वाचे आहेच; परंतु नागरिकांचे व्यवहार चालू राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे वाटते. 
- कपिल डकवा, हार्डवेअर विक्रेता

दोन महिन्यांत कपड्यांचे मोठे नुकसान
मागील दोन महिन्यांत कपड्यांचे दुकान उघडले नाही. यामुळे कपड्यांची घडी मोडली नाही. परिणामी, कपड्यावर घडीच्या ठिकाणी रेषा पडल्या असतील, कपडे खराब झाले असतील. कोरोनामुळे लॉकडाऊन आवश्यक होता; पण आता दुकाने बंद असतानाही रुग्णांची संख्या वाढत आहे. किराणा दुकानापेक्षा अन्य दुकानांत ग्राहकांची गर्दी कमी असते. दिवसभरात १० ते १५ ग्राहक येत असतात. सोशल डिस्टन्सिंंग पाळले जाते. नोकरांचा पगार कसा करावा, असा प्रश्न अनेक विक्रेत्यांना पडला आहे.  याकरिता लॉकडाऊन शिथिल करून  सर्व दुकाने सुरू करण्यात यावीत. 
-विजय तलरेजा, कापड व्यापारी 

बांधकाम क्षेत्र अडचणीत 
बांधकाम प्रकल्प पूर्णपणे ठप्प पडले आहेत. शहरात राहणारे मजूर, कारागीर यांना साईडवर जाण्यास परवानगी नाही. बांधकाम व्यवसाय चोहोबाजूने संकटात सापडला आहे. यासाठी बांधकामाच्या ठिकाणी काम करण्यास स्थानिक मजूर, कारागीर यांना परवानगी द्यावी.बांधकाम साहित्याची दुकाने सुरू करण्यात यावीत.  
-सुनील पाटील, बांधकाम व्यावसायिक

दुकाने सुरू व्हावीत
उन्हाळ्याचा मोठा हंगाम निघून गेला आहे. यामुळे व्यापारी उलाढालीत ५ वर्षे पाठीमागे गेले आहेत. आता सणासुदीचे दिवस सुरू होतील. गणेशोत्सवापासून इलेक्ट्रॉनिक वस्तूंना मागणी सुरू होईल. यामुळे आता पुढील हंगामाची पूर्वतयारी करण्यासाठी १ जूनपासून दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी.   -पंकज  अग्रवाल,  इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक

Web Title: The decision should be in the public interest; Traders hope to get permission to open shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.