गणित, भौतिकशास्त्र वगळण्याचा निर्णय चुकीचा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:05 AM2021-03-16T04:05:31+5:302021-03-16T04:05:31+5:30
अभियांत्रिकी : ‘ग्लोबलायझेशन’च्या दृष्टिकोनातून निर्णय घेतलेला असावा औरंगाबाद : गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय बारावीला न घेताही विद्यार्थी ...
अभियांत्रिकी : ‘ग्लोबलायझेशन’च्या दृष्टिकोनातून निर्णय घेतलेला असावा
औरंगाबाद : गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय बारावीला न घेताही विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ शकतात, असा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे. अलीकडच्या काळात दरवर्षी अभियांत्रिकीच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त राहत असल्याने, त्या भरण्यासाठी तर ही तडजोड केली जात नाही ना, असा प्रश्न तज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.
गणित, भौतिकशास्त्र हे दोन विषय सिव्हील, मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल या अभियांत्रिकीच्या मुख्य शाखांचा कणा मानला जातो. त्यामुळे अकरावी- बारावीला या विषयांचे ज्ञान न घेता अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यास विद्यार्थी कौशल्य आत्मसात करू शकणार नाहीत, असेही तज्ज्ञांचे मत आहे. दुसरीकडे असाही सूर आहे की, नवीन शैक्षणिक धोरणात जागतिकस्तरावर सारखेच शिक्षण उपलब्ध व्हावे, याचा विचार केला असून, त्यानुसार ही नवीन संकल्पना ‘एआयसीटीई’ने अमलात आणण्याचा विचार केलेला असावा.
बारावीला या विषयांचे शिक्षण न घेता अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने किंवा विद्यापीठाने स्वतंत्र मार्गदर्शन वर्ग (ब्रिज कोर्स) तयार करावेत.
जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासह खासगी विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये १३ असून, अडीच हजार विद्यार्थी क्षमता आहे.
चौकट..
अत्यंत विचित्र व विसंगत निर्णय
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने घेतलेला हा निर्यण अत्यंत विचित्र व विसंगत आहे. गणित व विज्ञान हेच तर अभियांत्रिकीसाठी लागणारे मूलभूत विषय आहेत. अकरावी व बारावीच्या या विषयांच्या मूलभूत ज्ञानावर आधारित पुढचे सर्व अभियांत्रिकीचे शिक्षण असते. गणित व भौतिकशास्त्राचे ज्ञान असणारे विद्यार्थी पुढे अभियांत्रिकीची पदवी घेऊन यशस्वीरीत्या बाहेर पडतात.
- प्रा. गोविंद कांबळे, गणितज्ज्ञ
गणित, भौतिकशास्त्र गरजेचेच
अभियांत्रिकीसाठी गणित व भौतिकशास्त्र हे दोन विषय गरजेचेच आहेत; परंतु ‘एआयसीटीई’ने या दोन विषयांसाठी ‘ब्रीज कोर्स’ची संकल्पना आणली आहे. विद्यापीठस्तरावर हे कोर्स तयार करण्याची गरज आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. अभियांत्रिकीच्या जागा रिक्त राहत असल्यामुळे हा निर्णय घेतलेला नाही. मात्र, ‘ग्लोबलायझेशन’चा दृष्टिकोन समोर ठेवून हा निर्णय घेतलेला असावा, असे दिसते.
- डॉ. उल्हास शिंदे
‘कोअर ब्रँचेस’साठी गणित, भौतिकशास्त्र गरजेचे
अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी गणित व भौतिकशास्त्र हे दोन विषय महत्त्वाचे आहेत. अभियांत्रिकीच्या सिव्हील, मेकॅनिकल व इलेक्ट्रीकल या कोअर ब्रँचेससाठी तर हे दोन विषय बंधनकारक आहेत. त्यामुळे ‘एआयसीटीई’ने या निर्णयाचा फेरविचार करावा.
- डॉ. अभिजित वाडेकर