औरंगाबादमधील शाळा सुरू करण्याचा आज निर्णय होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 01:27 PM2020-11-21T13:27:48+5:302020-11-21T13:32:29+5:30
राज्य सरकारने कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे राज्यातील माध्यमिक विभागाच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगाबाद : राज्य सरकारच्या निर्देशानुसार २३ नोव्हेंबरपासून शहरात माध्यमिक विभागाच्या शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक पातळीवर सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे शाळा सुरू कराव्यात किंवा नाही, असा पेच महापालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. उद्या यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.
राज्य सरकारने कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे राज्यातील माध्यमिक विभागाच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे. शहरात माध्यमिकच्या ३६१ शाळा आहेत. इयत्ता नववी ते बारावी वर्गातील सुमारे ७८ हजार विद्यार्थी घराबाहेर पडणार आहेत. सुमारे साडेतीन हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीदेखील शाळेत येणार आहेत. महपालिकेनेही शाळा सुरू करण्यापूर्वी कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक सर्व उपाययोजना खासगी शाळांकडून करून घेण्यासाठी कंबर कसली आहे.
मागील दोन दिवसांत केंद्रीय मुख्याध्यापक, नंतर केंद्रनिहाय मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन खासगी शाळांना कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. शिवाय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणीदेखील सुरू करण्यात आली आहे. गुरुवारपर्यंत शहरातील १ हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. तीन दिवसांपासून शहरात आणि परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी शाळा सुरू करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या आहेत. शहरात शाळा सुरू करण्यासंदर्भात पालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, शहरात शाळा सुरू करायच्या की नाही, याबाबत शनिवारी निर्णय घेणार आहोत. सर्व परिस्थिती लक्षात घेऊन चर्चेतून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरात महापालिकेच्या ७२ शाळा असून, त्यापैकी १७ माध्यमिक शाळा आहेत. माध्यमिकचे वर्ग सुरू करण्यासाठी वर्गखोल्यांच्या निर्जंतुकीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले आहे, तसेच ४४ शिक्षकांची कोरोना चाचणीदेखील केली.