आज फैसला !
By Admin | Published: October 19, 2014 12:01 AM2014-10-19T00:01:12+5:302014-10-19T00:20:20+5:30
जालना : विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होणार, याबाबत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये असलेल्या उत्सुकतेला रविवारी दुपारी जाहीर होणाऱ्या निकालानंतर पूर्णविराम मिळणार आहे.
जालना : विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होणार, याबाबत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांमध्ये मतदारांमध्ये असलेल्या उत्सुकतेला रविवारी दुपारी जाहीर होणाऱ्या निकालानंतर पूर्णविराम मिळणार आहे. या निकालाबाबत आज शेवटच्या दिवशीही बाजारात सट्टा तेजीतच होता.
या निवडणुकीत युती आणि आघाडीत फूट पडल्याने पाचही मतदारसंघात चारही प्रमुख पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. परिणामी निवडणूक चुरशीची झाली. मतदानानंतर कोण उमेदवार विजयी होणार, याबाबत त्या-त्या पक्षांचे उमेदवार वगळता अन्य कोणीही ठाम दावा करताना दिसत नव्हते. त्यामुळे कोणत्या मतदारसंघातून विजयश्रीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, या विषयीची उत्सुकता कायम राहिली.
अनेक दिवसानंतर सट्टेबाजारही तेजीत आला. विशेष म्हणजे बाजारात सट्टा लावणाऱ्यांचीही संख्याही यावेळी अधिक होती, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
निवडणूक लागल्यापासून राजकीय वातावरणाने कळस गाठला. कोण बाजी मारणार, यावर शनिवारीही शर्यती, पैजा लागत होत्या. निवडून कोण येणार, त्याचबरोबर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाला कोण राहणार, यावरही काही जणांनी शर्यती लावल्या. सट्टेबाजारातील जाणकारांच्या माहितीनुसार काही निकाल धक्कादायक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यात पाच मतदारसंघातून एकूण ७७ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. त्यातील मातब्बर उमेदवारांना प्रचारादरम्यान मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी रविवारी निकालानंतरच विजयश्रीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, हे स्पष्ट होणार आहे.
४पाचही मतदारसंघांमध्ये निवडणूक अतिशय चुरशीची झाली. मातब्बर उमेदवारांनी अक्षरश: जिवाचे रान केले. त्यामुळे गेल्या पंधरवाड्यात सर्वत्र वातावरण ढवळून निघाले होते.
४२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल दुपारी ३ वाजेपर्यंत घोषित झाला होता. यंदा त्यापेक्षाही एक तासाने कमी म्हणजे दुपारी २ वाजेपर्यंत निकाल अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.
४याबाबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश जोशी म्हणाले की, सर्वसाधारणपणे सहा-सात तासांमध्ये हा निकाल अपेक्षित आहे. याबाबत जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी सर्व मतमोजणी प्रक्रियेवर नियुक्त कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सरासरी दुपारी २ वाजेपर्यंत निकाल लागणे अपेक्षित आहे.