भाजपाच्या विजयात संभाजीरावांनी बांधलेली मोट निर्णायक

By Admin | Published: February 27, 2017 12:33 AM2017-02-27T00:33:47+5:302017-02-27T00:38:14+5:30

लातूर पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाच्या विजयात सर्वाधिक वाटा असलेले नेते आहेत.

The decisive factor that the Samajwadi Party has built in BJP's victory | भाजपाच्या विजयात संभाजीरावांनी बांधलेली मोट निर्णायक

भाजपाच्या विजयात संभाजीरावांनी बांधलेली मोट निर्णायक

googlenewsNext

दत्ता थोरे लातूर
पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाच्या विजयात सर्वाधिक वाटा असलेले नेते आहेत. आ. विनायकराव पाटील यांना पक्षात घेऊन अहमदपूर तालुका आणि विधानसभा मतदारसंघात त्यांनी भाजपाचे वाढविलेले बळ आणि आ. सुधाकर भालेराव, रमेश कराड, माजी आमदार गोविंद केंद्रे अशा साऱ्या ग्रामीण नेत्यांना घेऊन त्यांनी बांधलेली पक्षाची मोट हेच भाजपाच्या जिल्हा परिषदेत मिळालेल्या बहुमताचे रहस्य आहे. पण त्यांच्यासकट भाजपातले हे नेते एकत्र येणे ही बाब पक्षाला जितकी चांगली आहे, तितकी ती कायम एकत्रच राहणे अवघड. ही एकी एकसंघ असणारी ‘मोट’ राहते की जिल्हा परिषदेपुरती बांधलेली ‘मोळी’ यावर खुद्द संभाजीराव आणि भाजपाचे पुढचे यश अवलंबून आहे.
३५ वर्षांची काँग्रेसची सत्ता जिल्हा परिषदेतून हद्दपार होईल, हे कुणी सांगितले तरी खरे वाटले नसते. पण हे घडले. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरांनी हे करून दाखविले. यासाठी त्यांनी केलेल्या व्यूहरचना निर्णायक ठरल्या. पहिला अफलातून मार्इंड गेम म्हणजे आ. विनायकराव पाटील यांना भाजपात घेणे. विनायकरावांच्या भाजपा प्रवेशाने स्वत: लातूर जिल्ह्यात पक्षाचे तीन आमदार झाले. या तीनही आमदारांच्या आपापल्या विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या ५८ पैकी ३५ जागा येतात. तर राहिलेल्या तीन विधानसभा मतदारसंघात २३. याशिवाय लातूर ग्रामीणमधून विधानसभेला पराभव झाल्यानंतर दररोज मशागत करणाऱ्या रमेश करांडांनी चौथा विधानसभा मतदारसंघ पक्षासाठी जिद्दीने लढविला. खुद्द आमदार त्रिंबक भिसे यांच्या गावातली पंचायत समिती त्यांनी खेचून आणली. भाजपाला मिळालेले यश हे चार विधानसभा मतदारसंघातलेच आहे. स्वत:च्या मतदारसंघात अपयश नको म्हणून शिरुर अनंतपाळच्या अ‍ॅड. संभाजीराव पाटील यांनाही संभाजीरावांनी पक्षात घेतले. छोटा-मोठा कशाला घ्यायचा असा संकुचित विचार केला नाही. या चार विधानसभा मतदारसंघातच पक्ष जिंकला. औशातल्या तीन जागा बोनस ठरल्या. प्रत्येकाने आपापल्या विधानसभा मतदारसंघातल्या जागा आमदारकीची निवडणूक लढावी तशाच पध्दतीने लढली. आपले सांभाळून दुसरीकडे कुणी गेले नाही की 'वाकूनही' बघितले नाही. इकडे पालकमंत्र्यांनी दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुख यांच्याबरोबर शाब्दिक लढाई खेळली. ज्यामुळे ते मतदारात चर्चेत आले. साधेपणाने लोकात गेले. दाढीही केली नाही. प्रचाराला गेल्यावर हरिनाम सप्ताह दिसला तर मांडी घालून बसले. महाप्रसाद म्हणून तिथेच जेवले. हे आतून की नाटक याचा निष्कर्ष अवघड आहे, पण मतदारांना नेमके हेच भावत गेले आणि त्यांची छबी बनत गेली. वरपासून खालपर्यंत भाजपा नेत्यांच्या शब्दांची अशीच भुरळ पडून मोदी, फडणवीस व पाटील लाटीचे लोण काँग्रेस वटवृक्षाची मुळे रुजलेल्या गावा-गावातपर्यंत कधीच पोहोचले हे कळलेही नाही.
अस्सल काँग्रेस मतदार असलेल्या ग्रामीण भागातही शहरी भाजपवाले पोहोचल्याचे या निवडणुकीने दाखवून दिले. नोटाबंदीचे अर्थतज्ज्ञांनी दाखवून दिलेले अपयश अद्याप तरी लोकांना दिसत नसल्याचेच निकालाचे आकडे सांगतात. ज्यावर काँग्रेसचा शाब्दिक प्रचारजोर होता.

Web Title: The decisive factor that the Samajwadi Party has built in BJP's victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.