पदवी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:03 AM2017-09-27T01:03:28+5:302017-09-27T01:03:28+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले. यात पदवीसह पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. सतीश दांडगे यांनी दिली.
विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक सोमवारी सायंकाळी उशिरा आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत परीक्षेच्या वेळापत्रकाला मंजुरी देण्यात आली आहे. या नवीन वेळापत्रकानुसार पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ६ नोव्हेंबरऐवजी १० नोव्हेंबरपासून घेण्यात येणार आहेत. यात बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी.सह इतर अभ्यासक्रमांचाही समावेश आहे. तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा ५ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. दिवाळीपूर्वीच परीक्षा घेण्याची तयारी परीक्षा विभागाने सुरू केली होती. याला बामुक्टा संघटनेतर्फे आक्षेप घेण्यात आला होता. दिवाळीनंतरच सर्व परीक्षा घेण्याची मागणीही करण्यात आली. यानुसार युवक महोत्सव, इंद्रधनुष्य युवक महोत्सवानंतरच परीक्षा घेण्यावर शिक्कामार्तब करण्यात आल्याचे डॉ. दांडगे यांनी स्पष्ट केले. परीक्षा मंडळाच्या बैठकीला कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. सतीश दांडगे आणि अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी उपस्थित होते.
युवक महोत्सव, इंद्रधनुष्यचा विचार
युवक महोत्सवाचा विचार या संभाव्य परीक्षा वेळापत्रकांची घोषणा करताना केला. विद्यापीठाचा युवक महोत्सव २९ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. तर परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठात इंद्रधनुष्य महोत्सव ५ ते ९ नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. या सर्व तारखांची संभाव्य वेळापत्रकात दखल घेण्यात आल्याचेही डॉ. दांडगे यांनी स्पष्ट केले.