परळी विधानसभेतील १२२ मतदान केंद्रे ‘अति संवेदनशील’ घोषित करा; हायकोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 06:52 PM2024-10-23T18:52:28+5:302024-10-23T18:53:20+5:30

निवडणूक आयोगाने २४ ऑक्टोबरपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचे आदेश

Declare 122 Polling Stations in Parli Assembly 'Highly Sensitive'; Petition to the High Court | परळी विधानसभेतील १२२ मतदान केंद्रे ‘अति संवेदनशील’ घोषित करा; हायकोर्टात याचिका

परळी विधानसभेतील १२२ मतदान केंद्रे ‘अति संवेदनशील’ घोषित करा; हायकोर्टात याचिका

छत्रपती संभाजीनगर : परळी-अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघातील २३३ पैकी परळीतील १२२ मतदान केंद्रे ‘अति संवेदनशील’ घोषित करा, अशी मुख्य विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. पारदर्शक मतदानासाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही लावावेत. कॅमेरे सलग चालू राहण्यासाठी दिवसभर अखंड विद्युत पुरवठा करावा. मतदान केंद्रांवर स्थानिक पोलिसांऐवजी एसआरपीएफचे जवान नेमावेत, अशी विनंती याचिकेत केली आहे.

याचिकेच्या अनुषंगाने भारतीय निवडणूक आयोगाने दि. २४ ऑक्टोबरपर्यंत शपथपत्र दाखल करण्याचा आदेश न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संतोष चपळगावकर यांनी दिले. याचिकेवर दि. २४ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) इच्छुक उमेदवार ॲड. माधवराव जाधव यांनी ॲड. वसंतराव साळुंके यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तीन वर्षे एकाच जिल्ह्यात कार्यरत जिल्हाधिकाऱ्यांची इतर जिल्ह्यांत बदली करावी. तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी स्थानिक मतरदारसंघातील नसावेत, अशी विनंतीही याचिकेत केली आहे.

बीडचे जिल्हाधिकारी पाठक चार वर्षांपेक्षा जादा काळापासून बीडमध्ये कार्यरत आहेत, त्यांची बदली करावी. तहसीलदार वैजनाथ मुंडे परळी तालुक्यातील सारडगावचे रहिवासी असून, मंत्री धनंजय मुंडे यांच्या कुटुंबाशी संबंधित आहेत. त्यांचीही बदली करावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने दि. १४ सप्टेंबर आणि दि. २९ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोग, मुख्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिवांकडे केली होती. मात्र, यावर कार्यवाही न झाल्याने त्यांनी याचिका दाखल केली.

खासदारांच्या तक्रारींची घेतली नव्हती दखल
विद्यमान खासदार बजरंग सोनवणे यांनी अशाच तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेतली नव्हती. परिणामी मतदान केंद्रे ताब्यात घेणे, बोगस मतदान, विरोधकांना प्रवेश नाकारणे असे प्रकार घडले होते, असा उल्लेख याचिकेत केला आहे. निवडणूक आयोगातर्फे ॲड. अलोक शर्मा काम पाहत आहेत.

Web Title: Declare 122 Polling Stations in Parli Assembly 'Highly Sensitive'; Petition to the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.