पंढरपूरच्या ईएसआयसी रुग्णालयाला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 08:59 PM2018-11-27T20:59:24+5:302018-11-27T20:59:50+5:30

वाळूज महानगर : पाच वर्षांपूर्वी कामगार रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या पंढरपुरातील ईएसआयसी रुग्णालयाला उतरती कळा लागली आहे. आठवडाभरापूर्वीच इंजेक्शन खोलीतील सिलींग कोसळल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. यामुळे कामगारांच्या जिवितास धोका निर्माण झाला असून, कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 The decline of the ESI Hospital of Pandharpur | पंढरपूरच्या ईएसआयसी रुग्णालयाला उतरती कळा

पंढरपूरच्या ईएसआयसी रुग्णालयाला उतरती कळा

googlenewsNext

वाळूज महानगर : पाच वर्षांपूर्वी कामगार रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या पंढरपुरातील ईएसआयसी रुग्णालयाला उतरती कळा लागली आहे. आठवडाभरापूर्वीच इंजेक्शन खोलीतील सिलींग कोसळल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. यामुळे कामगारांच्या जिवितास धोका निर्माण झाला असून, कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात. उपचाराअभावी त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ईएसआय प्रशासनातर्फे कामगार रुग्णांसाठी पंढरपुरात ईएसआयसीचे मॉडेल डिस्पेन्सरी उभारले आहे. रुग्णालयाच्या इमारतीसाठी ५ कोटी ९१ लाख रुपयांचा निधी खर्च करुन २०१२-१३ मध्ये इमारत बांधण्यात आली. तत्कालीन केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांच्या हस्ते २०१५ मध्ये थाटात रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. रुग्णालय सुरु झाल्यानंतर अवघ्या एक-दोन वर्षात इमारतीच्या भिंतीच्या तडे जाऊन काचा व फरशा गळून पडायला सुरुवात झाली. यावर दुरुस्तीसाठी प्रशासनाने पुन्हा लाखो रुपये खर्च केले. तरीही इमारतीची पडझड अजून सुरुच आहे. आठवडाभरापूर्वीच इंजेक्शन रुम व ड्रेसिंग रुम मधील सिलींग कोसळले.

ही घटना प्रशासनाने दाबून ठेवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंगळवारी काही सुज्ञ कामगारांमुळे ही घटना उघडकीस आली. दोन्ही खोल्यांमधील भिंत कोसळून भिंतीचे सिमेंट गट्टू सिलिंगवर पडल्याने सिलिंगचा काही भाग तुटला आहे. अजूनही कोसळलेले गट्टू सिलिंगवर तसेच पडलेले असून, कोणत्याही क्षणी सिलिंगचा भाग तुटण्याची भिती व्यक्त केली जात आहे. याच खोलीत रुग्णांना इंजेक्शन देवून उपचार केले जातात.

त्यामुळे रुग्णांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच येथील अग्निशमन यंत्रणा धूळ खात असून, लिफ्टही कायम बंद असते. या भागात विजेचा लपंडाव सुरु असतो. जनरेटरही बंदावस्थेच असल्याने त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे डॉक्टरांसह रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करुन बांधलेल्या इमारतीला अवघ्या पाच वर्षांतच उतरती कळा लागल्याने बांधकामाच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या विषयी रुग्णालयाचे प्रमुख डॉ. व्यंकट यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी कोसळलेल्या भिंतीविषयी वरिष्ठांना कळविले असल्याचे सांगितले.

इमारतीच्या कामाची तपासणी करावी ..
निकृष्ट दर्जाचे बांधकाम काम केल्यामुळेच इमारतीला उतरती कळा लागली आहे. इमारतीच्या कामाची तात्काळ तपासणी करावी, अशी मागणी ईएसआय कामगार संघटनेचे प्रकाश जाधव यांनी केली आहे.

कामगार रुग्णाच्या जिविताला धोका ..
या रुग्णालयात दररोज जवळपास ६०० कामगार रुग्ण येतात. अल्पावधीतच इमारतीची दुरावस्था झाली असून, नुकतीच भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याचे संतोष दळवी यांनी सांगितले.

Web Title:  The decline of the ESI Hospital of Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.