मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
By Admin | Published: August 31, 2016 12:06 AM2016-08-31T00:06:13+5:302016-08-31T00:35:56+5:30
औरंगाबाद : सलीम अली सरोवराजवळील ड्रेनेज लाईनमध्ये उतरून काम करणाऱ्या प्रदीप हरिश्चंद्र घुले या २५ वर्षीय तरुण कामगाराचा विषारी वायुमुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला.
औरंगाबाद : सलीम अली सरोवराजवळील ड्रेनेज लाईनमध्ये उतरून काम करणाऱ्या प्रदीप हरिश्चंद्र घुले या २५ वर्षीय तरुण कामगाराचा विषारी वायुमुळे श्वास गुदमरून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. मंगळवारी घुलेच्या कुटुंबियांनी घाटीत मृतदेह घेण्यास नकार दिला. महापौर त्र्यंबक तुपे यांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
शताब्दीनगर येथील प्रदीप घुले आणि शेख अकबर शेख खाजा हे दोघे कामगार कंत्राटदार प्रभाकर मते पाटील यांच्याकडे काम करीत असत. सोमवारी दोघे हडको एन-१२ परिसरातील विविध ड्रेनेज लाईनचे काम करून निघून गेले. घुले हा सायंकाळी बायको मुलीसह नातेवाईकांकडे गेला. यावेळी कंत्राटदार मते यांनी त्याला परत कामावर अर्जंट येण्यास सांगितले. न आल्यास कामावरून काढून टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे घुले धावत-पळत सलीम अली सरोवराजवळील विसर्जन विहिरीजवळ पोहोचला. तेथे ड्रेनेजची तपासणी करण्याचे आदेश कंत्राटदाराने दिले. घुले मागचा पुढचा विचार न करता चेम्बरमध्ये उतरला. आतील विषारी वायुमुळे तो गुदमरून बेशुद्ध झाला. त्याला पाहण्यासाठी शेख अकबर खाली गेला. तो सुद्धा बेशुद्ध होऊन आत पडला. या घटनेची माहिती त्वरित अग्निशमन दलाला देण्यात आली. रुग्णालयात नेईपर्यंत घुले याचा मृत्यू झाला. शेख अकबर मृत्यूशी झुंज देत आहे. त्याच्या मेंदूत विषारी वायू गेला आहे.
जोपर्यंत त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मोबदला मिळत नाही, तोपर्यंत घाटीत मृतदेह घेणार नाही, अशी भूमिका घुले कुटुंबियांनी घेतली. महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड यांनी घाटीत जाऊन घुले कुटुंबियांना आर्थिक मोबदला देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला.
प्रदीप घुले याच्या मृत्यूस कारणीभूत असलेला दोषी कंत्राटदार आणि मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्वपक्षीय दलित अत्याचारविरोधी कृती समितीतर्फे करण्यात आली.