विद्यापीठातील अनेक अध्यासने झाल्या शोभेच्या वस्तू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:05 AM2021-02-27T04:05:36+5:302021-02-27T04:05:36+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महापुरुषांच्या नावाने असलेली काही अध्यासने निव्वळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. अध्यासन केंद्रांच्या ...
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील महापुरुषांच्या नावाने असलेली काही अध्यासने निव्वळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. अध्यासन केंद्रांच्या निर्मितीचा उद्देश साध्य झाला नसल्याचा ठपका ‘अध्यासन केंद्र पुनर्रचना समितीने ठेवला असला, तरी अशी अध्यासने बंद करण्याचे धाडस आजपर्यंत एकाही कुलगुरूंनी केलेले नाही.
राष्ट्र निर्मितीत योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या विचाराने विद्यार्थी प्रेरित व्हावेत. या महापुरुषांच्या जीवन कार्यावर संशोधन कार्य व्हावे, या हेतूने विद्यापीठ निधीतून विविध अध्यासनांची निर्मिती करण्यात आली. अस्तित्वात असलेल्या अध्यासनांमध्ये गौतम बुद्ध अध्यासन केंद्र, महात्मा फुले अध्यासन केंद्र, राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, महात्मा गांधी अध्यासन केंद्र, ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र, शाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्र, वसंतराव नाईक अध्यासन केंद्र, शहीद भगतसिंग अभ्यास केंद्र, बाळासाहेब पवार अध्यासन केंद्र, मौलाना आझाद अध्यासन केंद्र, सी.व्ही. रामानुजन संशोधन केंद्र, ग्रामीण समस्या संशोधन केंद्र, विलासराव देशमुख अध्यासन केंद्र, आद्य कवी मुकुंदराज अध्यासन केंद्र, वामनदादा कर्डक अध्यासन केंद्र, गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास संशोधन संस्था अशी १८ अध्यासन केंद्रे कार्यरत आहेत. यापैकी वर्षभरात प्रामुख्याने ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्र, वसंतराव नाईक अध्यासन केंद्र, राजर्षी शाहू महाराज संशोधन केंद्र, बाळासाहेब पवार अध्यासन केंद्र, मौलाना आझाद अध्यासन केंद्र या व अन्य एक- दोन अशा बोटावर मोजता येतील एवढ्याच अध्यासनांकडून कृती कार्यक्रम राबविण्यात आले. अन्य अध्यासनांनी फक्त जयंती व पुण्यतिथीशिवाय फारसे काही केलेले दिसत नाही.
अध्यासनांमार्फत पीएच.डी. व एम.फील.च्या माध्यमातून संशोधनाचे काम व्हावे, हा हेतू आहे. यासाठी विद्यापीठ निधीतून पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यास दरमहा सहा हजार रुपये, तर एम.फील. करणाऱ्या विद्यार्थ्यास चार हजार रुपयांची फेलोशिप दिली जाते. फेलोशिप मिळते म्हणून संशोधन करायचे, हा पायंडाही बऱ्यापैकी रूढ झाला आहे. आतापर्यंत झालेले संशोधन किती समाजोपयोगी पडले, हाही संशोधनाचा विषय आहे, असे विद्यापीठाचे प्राध्यापक खासगीत बोलताना प्रश्न करतात. दुसरीकडे, प्रती अध्यासन केंद्रास एक लाख
रुपयांचे अनुदान दिले जाते. हा निधी अत्यंत अपुरा असल्यामुळे राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय चर्चासत्रे कशी आयोजित करणार, असा प्रश्न संचालकांनी उपस्थित केला आहे.
चौकट.....
अध्यासनांचा हेतूच सफल झाला नाही
अध्यासन केंद्र पुरर्रचना समितीचे अध्यक्ष राजेश करपे म्हणाले की, ताराबाई शिंदे स्त्री अध्यासन केंद्र सोडले, तर अन्य एकाही केंद्राला यूजीसीचे अनुदान मिळत नाही. विद्यापीठाकडून अनुदान मिळते ते अत्यल्प आहे. असे असले तरीही ज्या पद्धतीने महापुरुषांच्या विचार-कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे, तो होताना दिसत नाही. संचालकांनी पुढाकार घेऊन समाजापुढे निर्माण झाले प्रश्न सोडविण्यासाठी उपक्रम हाती घेतले पाहिजेत.