गुरांची संख्या घटल्याने शेणखताचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:06 AM2021-05-20T04:06:08+5:302021-05-20T04:06:08+5:30
शेणखत टाकल्यानंतर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषतः अद्रक, मिरची, भाजीपाला, कापूस, मका ही पिके घेणारे शेतकरी शेणखताचा वापर ...
शेणखत टाकल्यानंतर पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढते. विशेषतः अद्रक, मिरची, भाजीपाला, कापूस, मका ही पिके घेणारे शेतकरी शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. पीक लावण्याच्या अगोदर शेतात शेणखत पांगवतात. रासायनिक खतासोबत शेणखताची मात्रा दिली, तर पीक जोमदार येऊन हमखास उत्पादन मिळते. त्यामुळे दरवर्षी शेणखत टाकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. शेतकऱ्यांकडून शेणखताची मागणी वाढत असताना यांत्रिकीकरणामुळे गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्यांची संख्या कमी होत आहे. मनुष्यबळाअभावी शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे कमी केले आहे. जनावारांची किंमत वाढल्याचा फटकाही पशुपालनास बसला आहे. चाऱ्याचे वाढलेले भाव व चाराटंचाई यामुळे शेतकरी जनावरे पाळण्यास नकार देत आहेत. या परिस्थितीत शेणखताचा तुटवडा निर्माण झाला आहे.
सेंद्रिय शेतीमुळे वाढली मागणी
सध्या अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. यात शेणखताला महत्त्व असल्याने शेतकरी शेणखत खरेदीसाठी दारोदार भटकत आहेत. ज्या शेतकऱ्याकडे शेणखत आहे, ते स्वतःच्या शेताला प्राधान्य देत असून, त्यांची गरज भागल्यानंतर शेणखताची विक्री करतात. सध्या चार हजार ते पाच हजार रुपये ट्रॅक्टर ट्रॉली या दराने शेणखताची विक्री सुरू आहे. ही रक्कम मोजूनही मुबलक शेणखत मिळण्याची खात्री नाही.