देशी मद्यासह बिअरच्या विक्रीत झाली घट
By Admin | Published: January 15, 2017 11:27 PM2017-01-15T23:27:08+5:302017-01-15T23:27:43+5:30
उस्मानाबाद :मागील वर्षात मात्र, देशी मद्याच्या विक्रीत २ टक्क्यांनी, बिअरच्या विक्रीत १० टक्क्यांनी तर वाईन विक्रीत ४ टक्क्यांनी घट झाली आहे़
उस्मानाबाद : जिल्ह्यात देशी, विदेशी मद्यासह बिअर व वाईनच्या विक्रीत प्रतीवर्षी वाढ होत असल्याचे राज्य उत्पादन शुल्कच्या वार्षिक अहवालावरून दिसून येते़ मागील वर्षात मात्र, देशी मद्याच्या विक्रीत २ टक्क्यांनी, बिअरच्या विक्रीत १० टक्क्यांनी तर वाईन विक्रीत ४ टक्क्यांनी घट झाली आहे़ देशीसह बिअर, वाईन विक्रीत घट झाली असली तरी दुसरीकडे विदेशी मद्याची मात्र, ५ टक्क्यांनी अधिकची विक्री झाल्याचे दिसून येत आहे़
शासनाला देशी-विदेशी मद्याच्या व्यवसायातून मोठा महसूल मिळतो़ शासनही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वर्षी टार्गेटनुसार कराची वसुली करते़ उस्मानाबादेतील राज्य उत्पादन विभागाच्या अहवालानुसार सन १६ मधील एप्रिल ते डिसेंबर अखेर पर्यंत २४ लाख ८ हजार८४४ बल्कलिटर देशी मद्याची विक्री झाली होती़ तर सन २०१६-१७ मध्ये एप्रिल ते डिसेंबर २०१६ अखेरपर्यंत यात ४४ हजार ७३१ बल्कलिटरची घट होऊन २३ लाख ६४ हजार ११३ बल्कलिटर देशी मद्याची विक्री झाल्याचे दिसून येते़ यात एप्रिल व मे १६ मध्ये मायनस ८ टक्के, जुन व जुलै १६ मध्ये मायनस एक टक्के, आॅगस्ट १६ मध्ये मायनस ३ टक्के विक्री झाली़ तर सप्टेंबरमध्ये २ टक्के वाढ झाली ही वाढ आॅक्टोबर महिन्यात ९ टक्क्यांवर गेली़ नोव्हेंबर मध्ये सरासरी विक्री झाली असली तरी डिसेंबर मध्ये पुन्हा ४ टक्क्यांची घट झाल्याचे दिसून येते़
विदेशी मद्यविक्रीची आकडेवारीत मात्र, २०१५ पेक्षा २०१६ मध्ये वाढ झाल्याचे दिसून येते़ एप्रिल ते डिसेंबर २०१५ अखेरपर्यंत ११ लाख ७६ हजार ६९९ बल्कलिटर विदेशी मद्याची विक्री झाली होती़ तर २०१६ मध्ये वरील कालावधीत यात ५ टक्क्यांची वाढ होऊन १२ लाख ३५ हजार ९०२ बल्कलिटर विदेशी मद्याची विक्री झाली़
एप्रिल १६ मध्ये २ टक्क्यांनी, मे मध्ये ५ टक्क्यांनी, जून मध्ये ११ टक्क्यांनी, जुलैमध्ये ८ टक्क्यांनी वाढ झाली़ आॅगस्ट महिन्यात मात्र, विदेशी मद्याची ३ टक्क्यांनी विक्री घटली होती़ सप्टेंबर महिन्यात यात १२ टक्क्यांची वाढ, आॅक्टोबरमध्ये १० टक्क्यांची तर नोव्हेंबरमध्ये ३ टक्क्यांची वाढ झाली़ डिसेंबर महिन्यात मात्र, विदेशी मद्यविक्रीत दोन टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येते़ बिरअच्या विक्रीत २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये तब्बल १० टक्क्यांनी घट झाली आहे़ एप्रिल ते डिसेंबर २०१५ या कालावधीत बिअरची २२ लाख ९८ हजार ६३ बल्कलिटर विक्री झाली होती़ तर २०१६ मध्ये यात २ लाख १९ हजार २४ बल्कलिटरची म्हणजे १० टक्क्यांची घट होऊन २० लाख ७९ हजार ३९ बल्कलिटर बिअरची विक्री झाली़ एकूणच प्रमुख स्त्रोत असलेल्या देशी व बिअरच्या विक्रीत मोठी घट झाल्याचे चित्र असून, दुष्काळासह नोटाबंदीचा फटका या व्यवसायालाही बसल्याचे दिसते़