डी.एड., बी.एड. अंतिम वर्षाच्या तीन हजार विद्यार्थ्यांना देता येणार टीईटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:02 AM2021-08-29T04:02:07+5:302021-08-29T04:02:07+5:30
-- डी.एड., बी.एड. अंतिम वर्षाच्या ३ हजार १०० विद्यार्थ्यांना देता येणार टीईटी विद्यार्थ्यांमध्ये आनंद : शिक्षण विभागाचे महाराष्ट राज्य ...
--
डी.एड., बी.एड. अंतिम वर्षाच्या ३ हजार १०० विद्यार्थ्यांना देता येणार टीईटी
विद्यार्थ्यांमध्ये आनंद : शिक्षण विभागाचे महाराष्ट राज्य परीक्षा परिषदेला आदेश
औरंगाबाद : शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टिईटी) आता डी.एड., बी.एड. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही संधी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील अंतिम वर्षात शिकत असलेल्या दोन हजार बी.एड. आणि १ हजार १०० डी.एड.च्या विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षा देता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १० ऑक्टोबर रोजी टीईटी परीक्षा होणार आहे. त्यासाठी ३ ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. मात्र, या परीक्षेसाठी बी.एड. आणि डी.एड.च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना संधी देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हे विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षेपासून वंचित राहणार होते. त्याविरोधात विद्यार्थ्यांनी आवाज उठविल्यावर शालेय शिक्षण विभागाने परीक्षा परिषदेला या विद्यार्थ्यांनाही ‘टीईटी’ची संधी देण्याचे आदेश दिले.
जिल्ह्यात डी.एड.चे ३ शासकीय, तर २७ खासगी महाविद्यालये असून, त्यात अंतिम वर्षात ११०० विद्यार्थी शिकत आहेत, तर बी.एड.च्या अंतिम वर्षात जिल्ह्यातील १८ महाविद्यालयांत १७०० विद्यार्थी तसेच एसएनडीटी विद्यापीठाशी संलग्नित ४ बी.एड. महाविद्यालयात ३०० विद्यार्थी शिकत आहेत. ‘टीईटी’बाबत परीक्षा परिषदेचा निर्णय लवकरच अपेक्षित असून, जिल्ह्यातील या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा मिळणार आहे, असे बोलले जात आहे.
----
जिल्ह्यात डी.एड.च्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी - २०००
बी.एड.च्या अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी - ११००
---
पाच सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार
शिक्षक पात्रता परीक्षेकरिता ३ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली. २५ ऑगस्टपर्यंत मुदत असलेल्या या प्रक्रियेला मुदतवाढ मिळाल्याने आता ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. सुरुवातीला बी.एड., डी.एड.च्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी नव्हती.
---
विद्यार्थी काय म्हणतात
---
कोरोनामुळे आधीच आर्थिक व शैक्षणिक स्थिती खराब झाली आहे. त्यात पुढे परीक्षा कधी होईल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे आता आम्हाला परीक्षेस संधी मिळाल्याने भवितव्य आशादायी वाटत आहे.
- गणेश बोरकर, बी.एड. अंतिम वर्ष विद्यार्थी
----
‘टीईटी’ परीक्षेची संधी हुकणार होती; पण शिक्षण विभागाने बी.एड., डी.एड. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी पात्र ठरविण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे.
-अश्विनी भालेराव, बी.एड. अंतिम वर्ष विद्यार्थी
---