हरणांचा पाण्यात बुडून मृत्यू, अधिकारी म्हणतात तुम्हीच घ्या पाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:07 AM2021-03-13T04:07:11+5:302021-03-13T04:07:11+5:30

बाजारसावंगी : गेल्या तीन दिवसांत विरमगाव आणि धामणगाव शिवारातील विहिरीत पडून दोन हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर ...

Deer drowning, officials say | हरणांचा पाण्यात बुडून मृत्यू, अधिकारी म्हणतात तुम्हीच घ्या पाहून

हरणांचा पाण्यात बुडून मृत्यू, अधिकारी म्हणतात तुम्हीच घ्या पाहून

googlenewsNext

बाजारसावंगी : गेल्या तीन दिवसांत विरमगाव आणि धामणगाव शिवारातील विहिरीत पडून दोन हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. यासंदर्भात वनविभागाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना माहिती देऊनही त्यांच्याकडून ‘तुम्हीच घ्या पाहून’ असे उत्तर मिळाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देण्याची साधी तसदीदेखील घेतलेली नाही. त्यामुळे वन्यप्राणी ठार झाले तर होऊ द्या, असा दृष्टिकोन असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही, असा संतप्त सवाल गावकऱ्यांकडून केला जात आहे.

विरमगाव शिवारात मंगळवारी (दि.९) एक हरिण विहिरीत पडून मृत झाली होती. याबाबत वनविभागाला तातडीने माहिती देण्यात आली. यानंतर दोन दिवसाने गुरुवारी (दि.११) धामणगाव शिवारातही एका हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाला. धामणगावातील गट क्रमांक- ५९ मधील सरलाबाई कामठे यांच्या शेतातील विहिरीत हरिण मृतावस्थेत आढळून आले. यासंबंधी रावसाहेब कामठे यांनी वनमजूर रामदास आघाडे यांना माहिती दिली. त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर चौकीदार दगडू घोडके घटनास्थळी आले. त्यांनी परिसरातील शेतकरी बाळू माचवे, शैलेश आघाडे आणि मोहन चव्हाण यांच्या मदतीने मृत हरणाला विहिरीतून बाहेर काढले. यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. याबद्दल वनपाल श्रेया कोटूरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही, तर खुलताबाद वनपरिक्षेत्र अधिकारी पेहेरकर यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे रानावनातील पाणीसाठे संपुष्टात आल्याने वन्यप्राणी शेतवस्तीकडे पाण्याच्या शोधात येत आहेत. त्यामुळे अशा घटना होत असल्यामुळे वनविभागाकडून कुठल्याच उपाययोजना राबविण्यात येत नसल्याची स्थिती आहे.

------

नेहमीप्रमाणे करा; वनपालाने दिला अजब सल्ला

विहिरीतून मृत हरिण बाहेर काढल्यानंतर चौकीदारांनी वनपाल यांना याबाबत माहिती दिली. यावर वनपालांनी आपण जसे नेहमी करतो तसेच करा, कोणी असेल तर पंचनामा करून घेऊन या. मी सही करून घेतो, असा अजब सल्ला दिला. पण घटनास्थळी वनपाल किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने येण्याची तसदीही सुद्धा घेतली नाही. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी अशा घटनेतबाबत सुद्धा किती गंभीर असल्याचे यावरून पुढे येते. खुलताबाद तालुक्यातील लोणी, बोडखा, झरी, वडगाव, दरेगाव, पाडळी, बाजारसावंगी, कनकशीळ, धामणगाव भागात मोठ्या प्रमाणात घनदाट वन असल्याने येथे वन्यप्राण्यांचा नेहमीच वावर असतो. त्यामुळे वनविभागाकडून उन्हाळ्यात पाणवठ्यात पाणीण्याची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे.

Web Title: Deer drowning, officials say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.