विवाहितेचे छायाचित्र सोशल मीडियात टाकून बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:04 AM2021-09-24T04:04:17+5:302021-09-24T04:04:17+5:30
औरंगाबाद : सामाजिक माध्यमातील दोन खात्यांद्वारे एका विवाहितेचे छायाचित्र पोस्ट करीत त्यावर अश्लील मजकूर लिहून तिच्या पतीला पाठविणाऱ्या आरोपीला ...
औरंगाबाद : सामाजिक माध्यमातील दोन खात्यांद्वारे एका विवाहितेचे छायाचित्र पोस्ट करीत त्यावर अश्लील मजकूर लिहून तिच्या पतीला पाठविणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अटक केलेल्या आरोपीचे नाव आदील नवाब पठाण (२१, रा. लोहगाव, ता. पैठण) असे आहे.
हर्सूल पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार विवाहिता माहेरी आली असताना तिच्या पतीच्या व्हाॅट्सॲपवर इन्स्टाग्रामवरील छायाचित्र व अश्लील मजकुराचा स्क्रीनशॉट पाठविण्यात आला. या बनावट अकाउंटवर विवाहितेचे इतरही अनेक छायाचित्रे दिसून आली. त्यावरही अतिशय घाणेरडा मजकूर लिहिलेला होता. यामुळे घाबरलेल्या विवाहितेने पती व आईच्या मदतीने सायबर पोलीस ठाणे गाठले. सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गौतम पातारे, सहाय्यक निरीक्षक अमोल सातोदकर यांच्यासह पथकाने तांत्रिक तपास करीत आरोपीचा शोध घेतला. तेव्हा आदील नवाब पठाण यानेच बनावट अकाउंट वापरून सदरील प्रकार केल्याचे समोर आले. आरोपी पठाण यास सायबर पोलिसांनी अटक करीत हर्सूल पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केेले. विवाहितेच्या आईने दाखल केलेल्या फिर्यादीवरून हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अमोल देवकर तपास करीत आहेत.