पन्नाशी ओलांडली मग एक काम नक्की करा, दरवर्षी डोळे तपासूनच घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 06:14 PM2022-06-21T18:14:24+5:302022-06-21T18:15:16+5:30
मधुमेही रुग्णांनी सहा महिन्यातून एकदा डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.
औरंगाबाद : चाळीस वर्षांवरील व्यक्तींमध्ये दृष्टी कमी होण्याच्या कारणांपैकी मोतीबिंदू हे अंधत्वाचे प्रमुख कारण आहे. डोळ्यांच्या आतमधील भिंग हे कॅमेऱ्याच्या भिंगाप्रमाणे काम करते. स्पष्ट दृष्टिकरिता दृष्टिपटलावर प्रकाशाचे केंद्रीकरण करते. आपल्याला लांबच्या व जवळच्या सर्व वस्तू स्पष्टपणे दिसण्याकरिता डोळ्यांचा केंद्रबिंदू अनुकूल बनविण्याचे काम भिंग करते. परंतु, जसजसे वय वाढत जाते, तसतशी शरीरातील काही प्रथिनांची एकत्रित गुठळी बनते. नेत्रभिंगावर आच्छादन वाढवते व त्यामुळे दिसण्यात अडचणी येतात. त्यामुळे पन्नाशीनंतर प्रत्येक वर्षी डोळ्यांची तपासणी करायला हवी, असे तज्ज्ञांचे मत आहे.
मोतीबिंदूची लक्षणे
मोतीबिंदू हा हळुहळू सुरू झाल्यावर दृष्टीवर परिणाम होतो. दृष्टी धूसर होते.
सूर्यपक्राश, दिव्याचा प्रकाश खूप प्रखर व चमकदार दिसू शकतो. रंगही पूर्वीएवढे उठावदार दिसत नाहीत.
न्युक्लिअर मोतीबिंदूत पुनर्दृष्टीचा अनुभव येतो. मात्र, ती अल्पकाळासाठी राहते.
मोतीबिंदूची कारणे
सूर्यप्रकाश, अतिनिल किरणांचे प्रमाण, मधुमेह, अतितणाव, रक्तदाब, स्थुलता, धूम्रपान, कॉर्टिकोस्टीरॉईड औषधांचा दीर्घकालीन उपयोग, कोलेस्ट्राॅल कमी करण्यासाठीच्या औषधांचा वापर, पूर्वी डोळ्यांना झालेली जखम, हार्मोन उपचार पद्धती, लघुदृष्टी दोष, अनुवंशिकता, व्हिटॅमिनची कमतरता मोतीबिंदूला कारणीभूत ठरतात.
काळजी काय घेणार
व्हिटॅमिन ई, कॅरोटीनॉईड, ल्युटीन आदी अन्नद्रव्यांचे सेवन जोखीम कमी करते. फळे व सूर्यफुल बिया, बदाम, पालक, मेथी, केळी, हिरव्या पालेभाज्या मोतीबिंदू टाळण्यासाठी मदत करतात. तर मधुमेही रुग्णांनी सहा महिन्यातून एकदा डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.
शासकीय रुग्णालयात फुकटात होते शस्त्रक्रिया
ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालये, आरोग्य केंद्रात ठरवून दिलेले नेत्रतज्ज्ञ तपासणीसाठी येतात. नियमित शिबिरांचे आयोजन होते. त्यात आवश्यकतेनुसार शासकीय रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे नियोजित केले जाते. घाटी रुग्णालयात नेत्र विभागात गुंतागुंतीच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत होतात.
शस्त्रक्रिया मोफत होते
राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात तज्ज्ञ तपासणी व उपचार मोफत करतात. जिल्हा रुग्णालयाच्या आमखास मैदान येथील नेत्र रुग्णालयात नेत्ररोगतज्ज्ञ नियोजित शस्त्रक्रिया मोफत करतात.
- डाॅ. महेश वैष्णव, नोडल ऑफिसर, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम