देगलूरच्या कलामंदिरला अवकळा
By Admin | Published: May 14, 2014 11:45 PM2014-05-14T23:45:30+5:302014-05-14T23:57:24+5:30
देगलूर : सर्व जातीधर्माच्या विवाहापासून विविध सोहळ्यांचा अनेक वर्षे एकमेव आधार असलेल्या देगलूर शहरातील कलामंदिर अर्थात एस़एम़ जोशी सभागृहाला पाहण्यासाठी कोणी वालीच नसल्यामुळे अवकळा आली आहे
देगलूर : सर्व जातीधर्माच्या विवाहापासून विविध सोहळ्यांचा अनेक वर्षे एकमेव आधार असलेल्या देगलूर शहरातील कलामंदिर अर्थात एस़एम़ जोशी सभागृहाला पाहण्यासाठी कोणी वालीच नसल्यामुळे अवकळा आली आहे. परिसरातील नागरिकांनी सभागृहाला सार्वजनिक शौचालय बनविले आहे़ तत्कालीन जनता दलाचे देगलूर शहरातील सक्रिय व दृष्टे नेतृत्व असलेले नगराध्यक्ष गंगाधरराव जोशी यांच्या प्रयत्नामुळे नगरपरिषद विकास कार्यक्रमांतर्गत ३२ लाख रुपयांचे सार्वजनिक एस़ एम़ जोशी सभागृह अर्थात कलामंदिर मंजूर झाले होते़ ही वास्तु बांधून पूर्ण झाल्यानंतर ३१ जानेवारी १९९१ रोजी जनता दला सरकारमधील माजी रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडीस यांच्या हस्ते या सभागृहाचे उद्घाटन झाले़ यावेळी माजी खा़ डॉ़व्यंकटेश काब्दे, नगराध्यक्ष गंगाधरराव जोशी, सहसंचालक गोडघाटे, मुख्याधिकारी बालाजीराव खतगावकर, बांधकाम सभापती नंदकिशोर दाशेटवार, शिक्षण, जकात, सांस्कृतिक सभापती तुळशीराम संगमवार, ऩप़ उपाध्यक्ष चिठ्ठावार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते़ १९९०-९१ पर्यंत देगलूर शहरात सर्वसामान्य, गोरगरीब, सर्व जातीधर्माच्या नागरिकांना विवाहासह अन्य कार्यक्रमासाठी मोठे सार्वजनिक सभागृह नव्हते़ १९९१ पासून या कलामंदिरात विविध मान्यवरांचे सत्कार, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम व हजारोवर विवाह झाले आहेत़ शहरात नगरेश्वर मंदिराची स्थापना झाल्यापासून कलामंदिर गोरगरिबांचे आधार बनले़ गोरगरिबांकडे व त्यांच्या वास्तूकडे श्रीमंताचे नेहमीच दुर्लक्ष होते़ तसाच प्रकार कलामंदिराच्यासंदर्भात घडला आहे़ उद्घाटनापासून रंगरंगोटी, पडझड, डागडुजीकडे जवळपास २३ वर्षे लक्ष न दिल्यामुळे या सभागृहाला आता अवकळा आली आहे़ ऩ प़ प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे परिसर वेगवेगळ्या काटेरी झाडांनी, कचरा, घाण यांनी व्यापला आहे़ तर कलामंदिरच्या आतील भागाला परिसरातील नागरिकांनी सार्वजनिक शौचालय बनविले आहे़ परिसरात या वास्तुमुळे दुर्गंधी पसरली आहे़ नगर- परिषदेला केव्हा जाग येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे़ (वार्ताहर)