दीक्षांत सोहळ्यानंतर पदव्यांची छपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 01:07 AM2018-05-17T01:07:09+5:302018-05-17T01:07:59+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पहिल्यांदाच बाहेरील कंपनीकडून पदव्या छापून घेतल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पहिल्यांदाच बाहेरील कंपनीकडून पदव्या छापून घेतल्या असल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी पदव्यांचा कागद बाहेरून विकत घेऊन पदव्यांची छपाई विद्यापीठातच केली जात होती. महाविद्यालयांमध्ये पाठविण्यात येणाऱ्या पदव्या दीक्षांत सोहळ्यानंतर बुधवारी (दि.१६) विद्यापीठात दाखल झाल्या आहेत.
विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यापूर्वीच सर्व अर्ज दाखल केलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पदव्यांची छपाई करण्यात येते; मात्र यावर्षी पहिल्यांदाच पदव्या बाहेरील कंपनीकडून छापून घेतल्या आहेत. या छपाई केलेल्या पदव्यांमध्येही अनेक चुका आढळून आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाकडे केल्या आहेत.
दीक्षांत सोहळ्यापूर्वी अर्ज भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पदव्यांची छपाई होणे आवश्यक असते; मात्र दीक्षांत सोहळ्याच्या दुस-या दिवशी विद्यापीठाला कंपनीकडून पदव्या छापून मिळाल्या आहेत. यात महत्त्वाची बाब म्हणजे आजपर्यंत पदव्यांच्या सुरक्षेसाठी विद्यापीठातच त्याची छपाई केली जात असे; मात्र यावर्षी पदव्यांचा कागद बलण्यात आला असून, त्या कागदावर पदवी छापण्याची यंत्रणा विद्यापीठाकडे नसल्यामुळे बाहेरून पदव्या छापून घेण्यात आल्या असल्याचे समजते. विद्यापीठामध्ये प्रिंटिंग प्रेस
आहे.
याशिवाय परीक्षा विभागातही मोठमोठी यंत्रे असताना पदव्यांच्या छपाईची आऊटसोर्सिंग केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
या पदव्या छपाईचे टेंडरही पुण्यातील एका कंपनीला दिल्याची माहिती समोर येत असून, परीक्षा विभागाची सर्वच कामे पुण्यातूनच होत असल्यामुळे त्याविषयी शंकाही उपस्थित करण्यात येत
आहेत.