तांत्रिक गुंत्यात अडकला पदवीचा निकाल; विद्यापिठाचे पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले
By पंकज पाटील | Published: August 2, 2022 04:15 PM2022-08-02T16:15:45+5:302022-08-02T16:21:24+5:30
सर्व अभ्यासक्रमाच्या निकालांना पुढील आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता विद्यापीठ प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.
औरंगाबाद : पदवी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण झाले. मात्र, दोन मूल्यांकन केंद्रातील आकडेवारीच्या तांत्रिक गुंत्यात निकाल अडकला आहे. निकालात त्रुटी राहू नये या काळजीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा निकाल लांबला आहे. त्यामुळे नियोजित पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रकही कोलमडले आहे.
कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी जुलैपूर्वी निकाल जाहीर होऊन १ ऑगस्टपासून पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकेल असे गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते. त्या दृष्टीने पदवी परीक्षेच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली. गेल्या चार दिवसांत कमी विद्यार्थी असलेल्या १० अभ्यासक्रमांचे निकाल जाहीरही झाले. मात्र, तो डेटा फिडिंग करताना दोन कॅस सेंटरवर तांत्रिक अडचणी आल्या आहे. सर्वच पदवी परीक्षार्थ्यांना असलेल्या महत्त्वाच्या विषयाच्या डेटात या अडचणी दिसून आल्याने या अडचणी दूर करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देऊन काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर बुधवारपासून निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्व अभ्यासक्रमाच्या निकालांना पुढील आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता विद्यापीठ प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.
युद्धपातळीवर काम सुरू आहे
पदवी परीक्षेच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले. मात्र, दोन केंद्रावरील डेटा एन्ट्रीत तांत्रिक अडचणी उद्भवल्या. त्या अडचणी दुर करण्यासाठी अधिकचे मनुष्यबळही देण्यात आले असून युद्धपातळीवर काम सुरू आहे. निकालात त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेत दोन दिवसांत निकाल जाहीर व्हायला सुरुवात होईल. त्यानंतर आठ ते दहा दिवसांत सर्व पदवी निकाल जाहीर होतील.
- डाॅ. श्याम शिरसाट, प्र. कुलगुरू, डाॅ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.
सर्व निकाल लागल्यानंतरचे प्रवेश प्रक्रिया
कुलगुरूंनी प्रवेश समितीची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत परीक्षा संचालकांकडून निकालाची स्थिती जाणून घेण्यात आली. पुढील आठवडाभरात निकाल लागण्याची शक्यता आहे. १०० टक्के निकाल लागताच प्रवेश समिती प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करून प्रक्रिया सुरू करेल.
-डाॅ. एस. टी. गायकवाड, अध्यक्ष, पदव्युत्तर प्रवेश समिती, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.