ऑक्टोबर उलटला, लांबलेल्या पावसामुळे परदेशी पक्ष्यांचे आगमनही लांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 02:46 PM2019-11-02T14:46:55+5:302019-11-02T14:50:08+5:30
जलाशयांना देशी-विदेशी पाहुण्यांची प्रतीक्षा
- रुचिका पालोदकर
औरंगाबाद : बदललेल्या ऋतुमानाचा, अवकाळी पावसाचा फटका निसर्गातील प्रत्येक घटकाला सोसावा लागतो आहे. यामुळेच दरवर्षी आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शहरातील पाणवठ्यांवर येणारे पक्षी नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाली तरीही आलेले नाहीत. बराच काळ रेंगाळलेल्या पावसामुळेच या परदेशी पाहुण्यांचे आगमन लांबले आहे.
याविषयी सांगताना पक्षीमित्र किशोर पाठक म्हणाले की, ग्लोबल वॉर्मिंग, ग्लोबल कुलिंग या सर्वांचाच फटका पक्ष्यांच्या प्रवासावर होतो आहे. सध्या कुठे अतिवर्षा, तर कुठे अवर्षण असे बदललेले वातावरण दिसत असून, पक्षी येण्याचा कालावधीही यामुळे बदलत चालला आहे. परदेशातून येणाऱ्या पक्ष्यांप्रमाणेच भारतातच एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांवरही लांबलेल्या पावसाचा परिणाम दिसत आहे.
औरंगाबामध्ये सप्टेंबरअखेरीस किंवा आॅक्टोबरपर्यंत तिबेट, युरोप, सायबेरिया, लडाख, हिमालय येथून पक्षी येतात. त्याठिकाणी जेव्हा बर्फवृष्टी होते किंवा अतिथंड तापमान होते तेव्हा तेथील जलसाठे गोठतात. जलचर बर्फामध्ये गाडले जातात. यामुळे पक्ष्यांची उपासमार होते आणि ते अन्नाच्या शोधात प्रवासाला निघतात. आता काही ठिकाणाहून हे पक्षी प्रवासाला निघालेले आहेत. प्रवासाला सोबत निघत असले तरी प्रवासादरम्यान ते अनेक ठिकाणी थांबतात आणि प्रत्येक ठिकाणी विखुरले जातात. सध्या पक्ष्यांच्या मार्गात असणाऱ्या राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश याठिकाणी अतिपाऊस झाला आहे. त्यामुळे काही पक्षी तेथेच थांबले असावेत. त्यांना आपल्या सुकना, सलीम अली सरोवर, जायकवाडी, गिरिजा, ढेकू येथील पाणवठ्यावर येण्यास उशीर होत आहे, असे मत पाठक यांनी व्यक्त केले.
वातावरणातील बदलाचा परिणाम
वातावरणातील बदलामुळे चक्रवात, हप्त्या बदक, मलिन बदक, लालसरी बदक हे तिबेट, युरोपमधून येणारे पक्षी, तसेच पट्टेरी हंस यांचे आगमन लांबले आहे. रिव्हरटन पक्षी म्हणजेच नदी सुरय, शिरवा सुरय, कुरव पक्ष्यांच्या विविध जाती, सुतवार, तुतारी हे युरोप, सायबेरिया, मध्य आशियातून येणारे पक्षीदेखील आतापर्यंत येणे अपेक्षित होते. वातावरणातील बदलाचा परिणाम या पाणपक्ष्यांवर जास्त झालेला दिसतो. त्या तुलनेत मात्र जंगलात, दाट झाडी असणाऱ्या आणि माणसांचा अधिवास नसणाऱ्या भाागात येणारे जंगल बर्ड मात्र गवताळ्यात आलेले आहेत. सध्या फिरफिऱ्या, लेटकुरी पक्ष्यांचे प्रकार (जांभळी, निळी, पिवळी) त्याठिकाणी पाहायला मिळत आहेत.
- किशोर पाठक, पक्षीमित्र
अपेक्षेपेक्षा कमी संख्या
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जवळपास सर्व पक्षी आलेले असतात; पण यंदा लांबलेल्या पावसामुळे नोव्हेंबरमध्ये पक्ष्यांची जी संख्या अपेक्षित होती त्याप्रमाणात खूपच कमी पक्षी आलेले आहेत. विविध जातींची बदके अजूनही आलेली नाहीत. यामध्ये केवळ शॉवेलर जातीची बदके आलेली आहेत. आतापर्यंत किंगटेल, शॉवेलरच्या सर्वच जाती, बार हेडेड गिज, चक्रवाक म्हणजेच गोल्डन डक हे पक्षी येणे अपेक्षित होते. काही फ्लेमिंगो गेलेच नव्हते ते अजूनही येथेच आहेत; पण दूर ठिकाणाहून येणारे फ्लेमिंगो आलेले नाहीत. कारमोरंट (पाणकावळा) या प्रकारातल्या आपल्याकडच्या पक्ष्यांच्या जाती आल्या आहेत; पण परदेशातून येणारे कारमोरंट अजूनही प्रवासातच आहेत.
- दिलीप यार्दी, पक्षीतज्ज्ञ