मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे गणित बिघडले; दिल्लीचा बाजार थंड, दर नसल्याने उलाढाल निम्मी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 05:24 PM2024-01-27T17:24:16+5:302024-01-27T17:27:52+5:30

पाचोड व परिसरातील गावांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड करतात. येथील मोसंबी सातासमुद्रापार गेलेली आहे.

Delhi market slow, turnover to 50 per cent as monsoon prices fall; Economy of the farmers has gone wrong | मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे गणित बिघडले; दिल्लीचा बाजार थंड, दर नसल्याने उलाढाल निम्मी

मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे गणित बिघडले; दिल्लीचा बाजार थंड, दर नसल्याने उलाढाल निम्मी

- अनिलकुमार मेहेत्रे

पैठण: दिल्ली येथील बाजारात मागणी नसल्याने पाचोडच्या मार्केटमध्ये मोसंबीचे दर कमालीचे घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने गोड मोसंबी शेतकऱ्यांसाठी यावर्षी आंबट ठरू लागली आहे.

पाचोड व परिसरातील गावांमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात मोसंबीची लागवड करतात. येथील मोसंबी सातासमुद्रापार गेलेली आहे. शेतकऱ्यांना मोसंबी विक्रीसाठी येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात २०१५ मध्ये मोसंबी मार्केट सुरू करण्यात आले. या मार्केटमध्ये परिसरातील विविध गावांमधील शेतकरी आंबा बहार व मृग बहारची मोसंबी विक्रीसाठी आणत असल्याने येथे खरेदीसाठी मुंबई, आंध्र प्रदेश, कलकत्ता, बिहार, दिल्ली, जालना, बीड आदी ठिकाणचे व्यापारीही दाखल झाले.

विशेषत: दिल्ली येथील व्यापाऱ्यांचा येथे खरेदीसाठी कल अधिक आहे. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांना जागेवर पैसे मिळत असताना दुसरीकडे स्थानिक मजुरांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. गतवर्षी येथील मार्केटमध्ये जानेवारी महिन्यात मृग बहार मोसंबीला प्रति टन २० ते २५ हजार रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळाला होता. यातून महिन्याला ५० लाख रुपयांची उलाढाल येथे होत होती. यावर्षी आजच्या घडीला दिल्लीत भरपूर प्रमाणात थंडी असल्यामुळे दिल्लीच्या मार्केटमध्ये अंबा बहार मोसंबीला उठाव नाही. त्यामुळे मृग बहार मोसंबीच्या दरात कमालीची घट झाली आहे.

यावर्षी जानेवारीच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या मोसंबीला ८ ते १३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. भाव कमी मिळत असल्याने उलाढालही घटली असून, आता दर महिन्याला फक्त २५ ते ३० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. विशेष म्हणजे दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आखडता हात घेत बाजारात कमी मोसंबी आणण्यास सुरुवात केली आहे. याबाबत मोसंबीचे व्यापारी शिवाजी भालसिंगे म्हणाले, गतवर्षी जानेवारी महिन्यात २५० ते ३०० टन मोसंबीची आवक होत होती. यावर्षी ती सरासरी १५० टन मोसंबी येत आहे.

कमी दरामुळे आले संकट
याबाबत पाचोड येथील शेतकरी शिवाजी भुमरे म्हणाले, माझ्या शेतात फळाला आलेले मोसंबीचे एक हजार झाड असून, मृग बहार व आंबा बहार दोन्ही मिळून मला चाळीस टन मोसंबीचे उत्पादन होते. मागील वर्षी मोसंबीला चांगला भाव होता; पण यावर्षी अजूनही दिल्लीत आंबा बहार मोसंबी मार्केटमध्ये सुरू असल्यामुळे व बिगर मोसमी पावसामुळे मृग बहार मोसंबीला कमी भाव मिळत आहे.

Web Title: Delhi market slow, turnover to 50 per cent as monsoon prices fall; Economy of the farmers has gone wrong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.