जाणीवपूर्वक गल्लीबोळातून नेले, महिलेने भर रस्त्यात रिक्षाचालकाला चप्पलने बदडले
By सुमित डोळे | Published: September 11, 2024 02:47 PM2024-09-11T14:47:53+5:302024-09-11T14:48:23+5:30
सहायक पोलिस आयुक्तांनी केलेल्या एकाही सूचनेचे रिक्षाचालकांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले.
छत्रपती संभाजीनगर : रिक्षाचालकांनी नियम, शिस्तीचे पालन करावे, महिला व तरुणींसोबत वागणूक चांगली ठेवावी, अशी तंबी सहायक पोलिस आयुक्तांनी सोमवारी दिली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी केलेल्या पाहणीत एकाही रिक्षाचालकाला त्याचे गांभीर्य नसून, बेशिस्तपणा कायम असल्याचे दिसून आले. ६० टक्के रिक्षाचालक गणवेशात होते. मात्र, कोणाच्याच ड्रेसवर बॅच, बिल्ला दिसला नाही. त्यामुळे बहुतांश रिक्षाचालक विनापरवाना असल्याचे समोर आले.
वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त धनंजय पाटील यांनी सोमवारी रिक्षाचालक संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. गणवेश, बॅच, बिल्ला वापरा, प्रवाशांवर दादागिरी करू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. ‘लोकमत’ने मंगळवारी शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर पाहणी केली, तेव्हा एकाही सूचनेचे रिक्षाचालकांना गांभीर्य नसल्याचे दिसून आले.
चुकीच्या रस्त्याने नेले, जास्त पैसे मागितले, महिलेने दिला चोप
४० वर्षीय महिला मुलीसह दुपारी पुंडलिकनगरातून मध्यवर्ती बसस्थानकात जाण्यासाठी सिटरच्या दराने रिक्षात बसली. चालकाने तिला मुख्य रस्त्याऐवजी गल्लीबोळातून नेले. महिलेने त्याला वारंवार विचारणा केली. मात्र, हाच रस्ता योग्य आहे, असे सांगत त्याने रिक्षा दामटली. एकाही प्रवाशाला बसवले नाही. बस स्थानकावर उतरल्यानंतर ३० रुपये ठरलेले असताना, ६० रुपये मागितले. यावरून महिलेने त्याला सुनावल्याने वाद वाढला. चालकाने अरेरावी सुरू केल्याने महिलेने थेट चप्पल काढून त्याला बदडण्यास सुरुवात झाली. जमलेली गर्दी व महिलेचा चढलेला पारा पाहून चालक निघून गेला. या घटनेमुळे महिलेची मुलगी घाबरून रडायला लागली होती.
कुठे काय आढळले?
स्थळ : महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप)
वेळ : दुपारी २
ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या दुकानासमोरील रस्त्यावर रिक्षाचालक उभे होते. दोन रिक्षाचालक एका प्रवाशाच्या अंगावर जाऊन रिक्षात बसण्यासाठी मोठ्या आवाजात हट्ट करत हाेते. प्रवासी एका रिक्षात बसला. मात्र, दुसऱ्या चालकाने मी त्याला आधी बोललो, म्हणून प्रवाशाला त्या रिक्षातून उतरायला भाग पाडले.
स्थळ : मध्यवर्ती बसस्थानक
वेळ : दुपारी १
बसस्थानकासमोरील दोन्ही बाजूचे अर्धेअधिक रस्ते रिक्षाचालकांनी व्यापले होते. भर रस्त्यात रिक्षा उभी करून प्रवासी शोधायला लांबपर्यंत जात हाेते. सिटी बसमध्ये बसण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशांसमोर जात कर्कश ओरडून रिक्षात बसण्यासाठी हट्ट करत होते.
स्थळ : सुतगिरणी चौक मार्ग
वेळ : दुपारी ४:३०
एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला रिक्षाचालकाने स्वत:च्या बाजूला बसवले होते, तर एका रिक्षाला मागे गेट नसतानाही प्रवाशाला बसवले होते. वळणाच्या ठिकाणांवरूनही तो सुसाट जात होता.