औरंगाबादेत महात्मा फुले सन्मान पुरस्कार थाटात प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:32 AM2018-04-12T00:32:16+5:302018-04-12T00:35:37+5:30
महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त औरंगपुरा येथील पुतळ्याजवळ उभारण्यात आलेल्या विचारपीठावर या वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले सन्मान पुरस्काराचे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते थाटात वितरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त औरंगपुरा येथील पुतळ्याजवळ उभारण्यात आलेल्या विचारपीठावर या वर्षापासून सुरू करण्यात आलेल्या महात्मा फुले सन्मान पुरस्काराचे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते थाटात वितरण करण्यात आले.
वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ समाजसेवक राधाकिसन शेवाळे, फकीरराव राऊत, डॉ. राजेंद्र धनवई, ज्येष्ठ पत्रकार स.सो. खंडाळकर, श्रीकांत सराफ, प्रा. सुदाम चिंचाणे, प्रा. प्रभाकर गायकवाड व सिनेट सदस्य प्रा. भारत खैरनार हे या पुरस्काराचे मानकरी ठरले. स्मृतिचिन्ह व बुके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
माणिक हॉस्पिटलमध्ये आग लागली असताना जीव धोक्यात घालून रुग्णांचे जीव वाचवणाऱ्या सलमान पटेल यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बसपाचे खा. वीरसिंग, आ. अतुल सावे, नगरसेविका कीर्ती शिंदे, नगरसेविका आशा निकाळजे, उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव, म. फुले जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मनोज घोडके, रामभाऊ पेरकर, रतनकुमार पंडागळे यांची मंचावर उपस्थिती होती. औरंगपुरा येथे फुले दाम्पत्याचा पुतळा उभारण्यात होत असलेल्या दिरंगाईबद्दल मनोज घोडके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर महापौर घोडेले यांनी सांगितले की, अनेक तांत्रिक अडचणींवर मात करीत आता फुले दाम्पत्यांचा पुतळा उभारण्याचा मार्ग सुकर झाला आहे. आता जिल्हाधिकारी हेच मनपा आयुक्तही आहेत. येत्या आठ दिवसांत औरंगपुरा येथे पुतळा उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल. ( टाळ्या)
जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष गणेश काळे, विलास ढंगारे, निशांत पवार, संदीप घोडके, गजानन सोनवणे,चंद्रकांत पेहरकर, संजीवनी घोडके, सरस्वती हरकळ, सुभद्रा जाधव, संगीता पवार, मंजूषा महाजन, किशोर माळी, योगेश हेकाडे, संजय माळी, सुनंदा कुदळे, मुन्ना शेवाळे,विजय महाजन, प्रा. बळीराम गादगे, जावेद खान आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
... नागसेन सावदेकरांच्या गाण्यांनी धमाल
प्रख्यात गायक नागसेन सावदेकर यांच्या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी यावेळी धमाल उडवून दिली. दोनच राजे इथे जाहले या गाण्याला सर्वाधिक पसंती मिळाली. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील वैचारिक संबंधांवर गायलेले गाणेही हिट ठरले. प्रख्यात निवेदक राजाभाऊ सिरसाट यांच्या खुमासदार सूत्रसंचलनाने कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. भिकन गवळी यांनी ढोलकीवर साथ दिली.