'ड्राय डे' ला मागणी पूर्ण करण्याची तयारी; तरुणाने झोमॅटोच्या बॅगमधून केली दारूची ‘डिलिव्हरी’
By सुमित डोळे | Published: April 18, 2024 03:01 PM2024-04-18T15:01:49+5:302024-04-18T15:15:56+5:30
पोलिसांना चकवा देण्याची नवी शक्कल; १०३२ बाटल्यांसह तरुण रंगेहाथ अटकेत
छत्रपती संभाजीनगर : पोलिसांना चकवा देण्यासाठी तसेच ग्राहकांना थंड बीअरचा पुरवठा करण्यासाठी छावणीच्या तरुणाने चक्क झोमॅटो बॅगमधून दारूची ‘डिलिव्हरी’ सुरू केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने छावणीच्या एका डेली निड्स दुकानावर छापा मारल्यानंतर ही बाब उघड झाली. प्रतीक किसनलाल जैस्वाल (२६) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून विदेशी दारू व बीअरच्या १,०३२ बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला.
गेल्या आठ दिवसांमध्ये सर्वत्र सण, उत्सवानिमित्त तीन वेळा ड्राय डे घोषित करण्यात आला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी अवैधरीत्या दारूचा साठा करून विक्री करण्याचे नियोजन करण्यात आले होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आनंद चौधरी यांना गुप्त बातमीदारातर्फे छावणीत एका नाष्ट्याच्या छोट्या हॉटेलमधून दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. बुधवारी चौधरी यांनी निरीक्षक गणेश नागवे, पूनम चव्हाण, प्रियंका राठोर, प्रवीण पुरी यांच्यासह त्या ठिकाणी छापा मारला. तेव्हा जैस्वालच्या दुकानात विदेशी दारू, बीअरच्या एकूण १,०३२ बाटल्या आढळून आल्या. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, त्याच्यावर यापूर्वीदेखील दोन वेळा कारवाई करण्यात आली होती.
झोमॅटो बॅग कशासाठी?
छावणी परिसरात एकच बार आहे. ड्राय डेला तो बंद असल्यावर कॉलवरदेखील दारूचा पुरवठा करतो. निवडणूक काळात पोलिसांना संशय येऊ नये म्हणून त्याने झोमॅटोच्या खाद्यपदार्थ पुरवठा होणाऱ्या पॉलिस्टर फॅब्रिकच्या बॅगमधून पुरवठा सुरू केला. शिवाय, त्यात बीअर असल्यास त्या गारदेखील राहाव्यात, या उद्देशानेदेखील त्याचा वापर केला. त्याच्याकडे दारू पिण्यासाठी येणाऱ्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयनेच त्याला त्या बॅग दिल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. जवान चेतन वानखेडे, हनमंत स्वामी, ज्ञानेश्वर सांबारे, किशोर सुंदर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली.