महिलेची रस्त्यावरच प्रसूती

By Admin | Published: July 15, 2017 12:46 AM2017-07-15T00:46:39+5:302017-07-15T00:54:07+5:30

वैजापूर : येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शहरातील कादरीनगर भागातील फरिदा महेमूद अन्सारी (२२) या गर्भवती महिलेची फरपट झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे

The delivery of the woman to the street | महिलेची रस्त्यावरच प्रसूती

महिलेची रस्त्यावरच प्रसूती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शहरातील कादरीनगर भागातील फरिदा महेमूद अन्सारी (२२) या गर्भवती महिलेची फरपट झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये खासगी वाहनाने नेत असताना लासूरस्टेशनजवळ गुरुवारी मध्यरात्री रस्त्यात ही महिला प्रसूत झाली. लक्झरी बसमधील महिला प्रवाशांच्या मदतीमुळे प्रसूती सुकर झाल्याचे महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांनी या प्रकाराबद्दल उपजिल्हा प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला.
वैजापूर शहरातील कादरीनगर भागातील रहिवासी फरिदा महेमूद अन्सारी या बाळंतपणासाठी माहेरी आल्या होत्या. त्यांना वेदना होऊ लागल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी प्रसुतीसाठी आणखी दोन ते तीन दिवस अवधी असल्याचे सांगून घरी पाठवले. मात्र त्रास सुरु झाल्याने त्यांना पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांना प्रसव वेदना सुरु झाल्या. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुंढे व त्यांच्या पत्नी हे दोघे ड्युटीवर होते. त्यांनी बाळाची नाळ गळ्यामध्ये अडकल्याचे सांगून पेशंटला औरंगाबादला पाठवण्याचा सल्ला दिला. पण औरंगाबादला नेण्यासाठी १०८ क्रमांकाची अ‍ॅम्ब्यूलन्स उपलब्ध नव्हती. शिवाय हॉस्पिटलमध्ये असलेल्या अ‍ॅम्ब्युलन्ससाठी चालक नसल्याने अडचणीत आणखीच भर पडली. अखेर महिलेच्या नातेवाईकांनी खासगी वाहन करुन महिलेला औरंगाबादला नेण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास नातेवाईकांना घेऊन हे वाहन औरंगाबादच्या दिशेने निघाले. परंतु तोपर्यंत अडचणी संपल्या नव्हत्या. फरिदा यांना रस्त्यातच वेदना असह्य झाल्याने चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला लासूर स्टेशन येथे थांबवली. त्याने येणाऱ्या- जाणाऱ्या अनेक वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुणीही प्रतिसाद दिला नाही. अखेर एक लक्झरी बस थांबली. या गाडीतील वयोवृद्ध महिलांच्या मदतीने महिलेची सुखरुप प्रसुती झाली. त्यानंतर लगेच त्याच वाहनाने पहाटे चार वाजेच्या सुमारास या महिलेला परत वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
मात्र येथील परिचारिकेने रेफर केल्याचे कारण सांगत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिला. अखेर डॉक्टर आल्यानंतर या महिलेला दाखल करुन उपचार करण्यात आले. या प्रकारामुळे हॉस्पिटलचा अंदाधुंदी कारभार चव्हाड्यावर आला आहे.
उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार रेल्वे वेळापत्रकानुसार
येथील दोन-चार कर्मचारी, दोन वैद्यकिय अधिकारी सोडले तर सर्वच कर्मचारी रेल्वेच्या वेळापत्रकानुसार काम करीत असल्याचे उघड झाले आहे.

Web Title: The delivery of the woman to the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.