‘डेल्टा प्लस’चा सोयगावकरांना सर्वाधिक धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:02 AM2021-06-28T04:02:06+5:302021-06-28T04:02:06+5:30
सोयगाव : तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यात ‘डेल्टा प्लस’ विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने सोयगावकरांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले ...
सोयगाव : तालुक्याच्या सीमेला लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यात ‘डेल्टा प्लस’ विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने सोयगावकरांमध्ये भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. वेळीच निर्बंध लावले गेले नाहीत, तर तालुक्यात डेल्टा पल्सचा शिरकाव होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह पोलीस प्रशासनाकडून कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला दिसून आला. त्याच जळगावात डेल्टा प्लस विषाणूचा रुग्ण आढळून आल्याने सोयगाव तालुक्यात धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील नागरिकांचा जळगावशी मोठा संपर्क सावळदबारा या भागातील बारा गावांचा येतो. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग दोन महिन्यांपासून ढेपाळलेला आहे. सीमेवर आलेल्या संकटामुळे तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज होण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रशासनाची उदासीनता
तालुक्यातील ८४० गावांपैकी ७२ गावांचा जळगाव जिल्ह्याशी व्यवसाय म्हणा की नातेसंबंधातून संपर्क येतोच. पेरणीचे दिवस असून तालुक्यातील नागरिकांची जळगाव जिल्ह्यात मोठी ये-जा होत असते. तालुक्यास डेल्टा प्लस विषाणूंचा मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र, आद्यपही तालुक्याच्या सीमेवर चेकपोस्ट लावण्यात आलेले नाही. आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी केली जात नाही. अर्थात प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.
पोलिसांची होणार दमछाक
तालुक्याला लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यात जाण्या-येण्यासाठी मुख्य रस्त्यावर चेकपोस्ट लावण्यात आले. तरीसुद्धा जळगाव जिल्ह्यात जाण्या-येण्यासाठी अनेक रस्ते असल्याने डेल्टा प्लस विषाणूला तालुक्याबाहेर थोपविण्यासाठी पोलीस प्रशासनाची दमछाक होणार आहे.