अजिंठा-गौताळा पर्यटन प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 07:42 PM2018-12-31T19:42:02+5:302018-12-31T19:42:26+5:30
गडकिल्ले तसेच वनराईने नटलेला हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने संपन्न अजूनही दुर्लक्षित आहे.
औरंगाबाद : अजिंठा ते गौताळा या पट्ट्यात एकूण ३३ पर्यटन स्थळे आहेत. गडकिल्ले तसेच वनराईने नटलेला हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने संपन्न अजूनही दुर्लक्षित आहे. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी अजिंठा-गौताळा टुरिझम कॉरिडॉर असावा आणि त्यासाठी विशेष पर्यटन प्राधिकरण असावे, अशा मागणीचे निवेदन दि. २८ रोजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना देण्यात आले.
यावेळी गणेशवाडी कृषी व ग्रामीण विकास संस्था उंडणगावचे अध्यक्ष आर्किटेक्ट अनिरुद्ध नाईक, जय फाऊंडेशनचे संजय कु लकर्णी यांनी यासंदर्भातील सादरीकरण तयार करून ते आयुक्तांना दाखविले. सुनील मोटे, विजय चौरंगे, विनय पाटणी, दामोदर मोरे, सदाशिव राठोड, संतोष बिसने, नंदकिशोर कुलकर्णी यांची यावेळी उपस्थिती होती.
सादरीकरणादरम्यान या भागातील निसर्ग समृद्धी पाहून आयुक्तांनी अजिंठा-गौताळा टुरिझम कॉरिडॉरसाठी प्राधिकरण स्थापन करण्याचे आश्वासन दिले. या परिसरातील स्थानिक धार्मिक पर्यटनातून होणारी आर्थिक उलाढाल याविषयीही यादरम्यान चर्चा झाली.
मराठवाडा व खान्देश यांना विभागणाऱ्या अजिंठा डोंगररांगांची एकूण लांबी १२५ किमी असून, बुलडाणा येथील जाईचा देव येथून ते पितळखोरा पाटणादेवीपर्यंतचा हा परिसर आहे. हा संपूर्ण परिसर गौताळा अभयारण्यासाठी राखीव असून, यादरम्यान वेताळवाडीचा किल्ला, जंजाळ्याचा किल्ला, अंतूरचा किल्ला, सुतोंड्याचा किल्ला, इतिहासातील इतर सैनिकी चौक्या आहेत. यासोबतच वडाली, अजिंठा, रुद्रेश्वर, धारेश्वर, पितळखोरा हे महत्त्वपूर्ण धबधबे आहेत.
कालदरी, भिलदरी, जाईचा देव, जगदंबा माता वाढोणा, अंबऋषी देवस्थान, रुद्रेश्वर मंदिर, मुर्डेश्वर मंदिर, कळसाई मंदिर, घाटनांद्राजवळील इंद्रगडी, जोगेश्वरी, मनूआई मंदिर, पिनाकेश्वर मंदिर, धारेश्वर मंदिर, पाटणादेवी मंदिर यासारख्या धार्मिक स्थळांनीही हा भाग समृद्ध आहे. २५० प्रकारचे पक्षी, विविध प्रकारचे प्राणी व वनस्पतींच्या विविध जाती या भागात आढळून येतात.
पर्यटनाच्या दृष्टीने हा परिसर समृद्ध असून, अजिंठा-गौताळा टुरिझम कॉरिडॉर पर्यटन प्राधिकरणामुळे या भागातील पर्यटन क्षेत्रातील विस्कळीतपणा दूर होऊन पर्यटकांची ये-जा सुरू होईल आणि यातून रोजगार निर्मिती होईल, असे म्हणणे यावेळी मांडण्यात आले.