महावितरणच्या उच्चदाब वितरण योजनेला लाचखोरीचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 01:48 PM2019-07-05T13:48:37+5:302019-07-05T13:52:25+5:30
कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी मागितले जातात शेतकऱ्यांकडे पैसे
औरंगाबाद : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) व मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेला औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत लाचखोरीचे ग्रहण लागले आहे. वीज जोडणीसाठी कंत्राटदारांकडून पैशाची मागणी करून अडवणूक केली जात असल्याची तक्रार दोन्ही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे.
महावितरणकडे मार्च-२०१८ पर्यंत कृषिपंपांच्या वीज जोडणीसाठी पैसे भरलेल्या राज्यातील जवळपास सव्वादोन लाख शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्याची घोषणा राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी केली होती. या योजनेत १ किंवा २ शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र रोहित्र देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळेल, असा दावा महावितरणने केला आहे. या योजनेद्वारे औरंगाबाद जिल्ह्यातील ६ हजार १०१ व जालना जिल्ह्यातील १० हजार ८४ शेतकऱ्यांना वीज देण्यात येणार आहे.
या दोन्ही जिल्ह्यांतील १६ हजार १८५ शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे महावितरणसमोर उद्दिष्ट आहे. मात्र, आतापर्यंत अवघ्या १११ शेतकऱ्यांना जोडणी मिळाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत दोन्ही जिल्ह्यांत ६ हजार ५९९ शेतकऱ्यांनी पैसे भरले आहेत. मात्र, आतापर्यंत अवघ्या १०६ शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. या दोन्ही योजनेत वीजजोडणी देण्याचा एवढा संथगतीने प्रवास असेल, तर ‘एचव्हीडीएस’मध्ये १६ हजार शेतकऱ्यांना तसेच सौरपंप योजनेत ६ हजार शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला वीज मिळण्यास किती वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सुरुवातीला काम परवडत नाही म्हणत कंत्राटदारांनी अनेक महिने निविदांवरच बहिष्कार टाकला होता. अखेर कंत्राटदारांची मनधरणी करीत महावितरणने निविदा प्रक्रिया पूर्ण केली. कार्यारंभ आदेश दिले. काही ठिकाणी या योजनेची कामे सुरू झाली आणि आता काही कंत्राटदारांकडून शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतकऱ्यांनी याबाबत महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे तक्रार देऊनही त्यांनी दखल घेतली नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे सदरील शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
दोन दिवसांत चौकशी करणार
यासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले, कंत्राटदारांकडून पैसे मागितले जातात, अशी शेतकऱ्यांकडून थेट तक्रार प्राप्त झालेली नाही. ‘एचव्हीडीएस’ व मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत पैशामुळे शेतकऱ्यांची कंत्राटदार अडवणूक करीत असल्याची पैठण तालुक्यातील काही कार्यकर्त्यांची तक्रार आहे. येत्या दोन दिवसांत प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन याबाबतची चौकशी केली जाणार आहे.