शेती समस्यांचा राजकीय कलगीतुरा थांबवून दुष्काळ जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:26 AM2017-08-14T00:26:24+5:302017-08-14T00:26:24+5:30
सरकारने शेती समस्यांचा राजकीय कलगीतुरा थांबवून त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी प्रा. एच.एम. देसरडा यांनी रविवारी (दि.१३) पत्रकार परिषदेमध्ये केली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी ओढ दिल्यामुळे झालेल्या खरीप पीकबुडीने शेतकरी हवालदिल झाला आहे. हे अस्मानी संकट आता सुल्तानी बनत असून, सरकारने शेती समस्यांचा राजकीय कलगीतुरा थांबवून त्वरित दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी प्रा. एच.एम. देसरडा यांनी रविवारी (दि.१३) पत्रकार परिषदेमध्ये केली. महाराष्ट्र राज्य दुष्काळ निवारण व निर्मूलन मंडळातर्फे आयोजित या पत्रपरिषदेमध्ये कृष्णा हरिदास व डॉ. कृष्णा हातोटे उपस्थित होते.
चालू वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत ५३१ शेतक ºयांनी आत्महत्या केल्याचे सांगत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, गेल्यावर्षी जरी भरघोस पीक आले असले तरी त्याला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी कर्जफे ड करू शकले नाहीत. ‘तत्त्वत:’ कर्जमाफी दिली खरी; परंतु तीदेखील व्यवस्थित अमलात आणली गेली नाही. कर्जमुक्तीच्या प्रश्नावर फडणवीस सरकारने विश्वासघात केला असून, पीकविम्यामध्ये त्यांनी अत्यंत चलाखीने केवळ कंपन्यांचा फायदा केला.
या पार्श्वभूमीवर मंडळातर्फे काही मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे तेथे लवकरात लवकर दुष्काळ किंवा सरकारी शब्दावलीप्रमाणे ‘टंचाईसदृश स्थिती’ घोषित करण्याची मागणी केली आहे. रोजगार हमी योजनेची कामे पुन्हा सुरू करणे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार गावागावांत अन्नपुरवठा करणे, सरसकट शेतकºयांना पीकविम्याचे संरक्षण द्यावे, आदी मागण्यात करण्यात आल्या आहेत.