विद्यावेतनाच्या मागणीसाठी घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी विकले फळे आणि वडापाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:09 PM2018-12-24T12:09:54+5:302018-12-24T12:13:07+5:30
घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टर हा रुग्णसेवेचा कणा समजला जातो.
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील निवासी डॉक्टरांचे दोन महिन्यांपासून विद्यावेतन थकले आहे. पैशांअभावी आता एकही दिवस काढता येत नसल्याने आज निवासी डॉक्टरांनी घाटी रुग्णालय परिसरात वडापाव आणि फळे विकून पैसे जमा केले.
घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टर हा रुग्णसेवेचा कणा समजला जातो. औषधीटंचाई, उपचार साहित्यांचा तुटवडा आणि त्यातून रुग्ण , रुग्णांच्या नातेवाईकांकडून व्यक्त होणारा रोष या सगळयाला सामोरे जात निवासी डॉक्टर रुग्णसेवा देतात, परंतु त्यांनाच अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे दिसते. विद्या वेतन मिळण्यास विलंब होण्याचा प्रकार सातत्याने होत आहे.
याविषयी वेळोवेळी प्रशासनाला माहिती देण्यात आली.तरीही सुधारणा झाली नाही. आता दोन महिन्यांपासून विद्या वेतन नाही. त्यातून आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी वडापाव , फळे विकण्याचा निर्णय घेतला. वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयाशेजारीच त्यांनी स्टॉल लावून वडापाव, फळे विकली. डॉक्टरांची ही परिस्थिती पाहून रुग्ण, रुग्णांच्या नातेवाईकांनी आश्चर्य व्यक्त केले.