दुकानांची वेळ दुपारी एक वाजेपर्यंत वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:05 AM2021-04-23T04:05:36+5:302021-04-23T04:05:36+5:30
औरंगाबाद : शहरात चार तासांऐवजी सहा तास दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघातर्फे करण्यात ...
औरंगाबाद : शहरात चार तासांऐवजी सहा तास दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा व्यापारी महासंघातर्फे करण्यात येत आहे.
जिल्हा व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने व सर्व लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्याने मागील आठवड्यात सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत दुकाने उघडण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली होती. दोन दिवस शहरात त्यानुसार सुरळीत व्यवहार झाले. मात्र, कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्य सरकारने बुधवारी रात्री ब्रेक द चेन अंतर्गत सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याचे जाहीर केले. जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी बाजारपेठेत फेरफटका मारला असता ११ वाजेच्या नियमाने दुकानदार व व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले. यासंदर्भात जिल्हा व्यापारी महासंघाचे सचिव लक्ष्मीनारायण राठी यांनी सांगितले की, आम्ही संपूर्ण लॉकडाऊनची मागणी केली होती; पण किराणा दुकाने फक्त चार तास उघडी ठेवण्याच्या आदेशाने गोंधळ उडत आहे. कारण सकाळी सात वाजता दुकाने उघडली तरी ग्राहक मात्र नऊ वाजल्यानंतर बाजारात खरेदीसाठी येत आहे. सामान घेईपर्यंत ११ वाजून जातात व दुकाने बंद करण्यात येतात. अनेकांना अर्धवट सामान देऊन दुकाने बंद करावी लागत आहे. बँकांचे व्यवहारसुद्धा करता येत नाही. यामुळे दुकाने उघडण्याचा कालावधी दोन तासांनी वाढून द्यावा.
चौकट -
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार
मागील आठवड्यापासून शहरातील कोरोना पॉझिटिव्ह होणाऱ्या रुग्णाच्या संख्येत घट झाली आहे. दुकाने सुरू ठेवण्यासाठी चार तासाचा वेळ अपुरा पडत आहे. त्याऐवजी सहा तास दुकाने उघडी ठेवल्यास त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. या संदर्भात आम्ही उद्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार आहोत.
जगन्नाथ काळे
अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ