मागणी घटताच सिमेंट,स्टीलचे भाव घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:01 AM2019-08-08T00:01:02+5:302019-08-08T00:02:08+5:30
औरंगाबाद : मागणी घटल्याने सिमेंट व स्टीलचे भाव घसरले आहेत. मंदीला मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीही कारणीभूत असल्याचे व्यावसायिकांचे मत आहे. ...
औरंगाबाद : मागणी घटल्याने सिमेंट व स्टीलचे भाव घसरले आहेत. मंदीला मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीही कारणीभूत असल्याचे व्यावसायिकांचे मत आहे.
व्यावसायिकांच्या मते औरंगाबाद शहरात दर महिन्याला ८० हजार टन सिमेंट, तर दीड हजार टन स्टीलची विक्री होत असते. पावसाळा सुरूहोऊन दोन महिने पूर्ण झाले तरी अजूनही जोरदार पावसाची मराठवाड्याला प्रतीक्षा आहे. दुष्काळाची परिस्थिती अजूनही कायम आहे. पाणीटंचाई असल्याने बांधकामाची गती कमी झाली आहे. दुसरीकडे देशात अनेक राज्यांत, मोठ्या शहरात पूरपरिस्थितीमुळे तिथेही बांधकाम प्रभावित झाले आहे. परिणामी, सिमेंटची मागणी घटल्याने कंपन्यांना भाव कमी करावे लागले आहे. दीड ते दोन महिन्यांपूर्वी सिमेंटचे भाव ३६० ते ३८० रुपये प्रतिगोणीपर्यंत जाऊन पोहोचले होते. सिमेंटच्या भाववाढीने उच्चांक गाठला होता. मात्र, नंतर परिस्थिती बदलली गोणीमागे ३५ ते ५५ रुपयांपर्यंत भाव कमी झाले. बुधवारी ३२५ ते ३३५ रुपये प्रतिगोणी सिमेंट शहरात विकल्या जात होते. महिन्याकाठी २० हजार टनाने सिमेंटची विक्री घटल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. स्टील उद्योगही सध्या मोठ्या मंदीला सामोरा जात आहे. देशातील काही स्टील उत्पादक कंपन्याही बंद पडल्या आहेत. मागणी कमी होत असल्याने बांधकामासाठी लागणाऱ्या सळाईचे भाव टनामागे ६ हजार रुपयांनी घटले आहेत. दीड महिन्यापूर्वी ४३ हजार रुपये टनने मिळणारी सळई गुरुवारी ३७ हजार रुपये टनाने विकली जात होती.
मराठवाड्यातील दुष्काळामुळे मंदी हटणे कठीण
देशभरात स्टील उद्योगात मंदी आहे. नवीन बांधकामाची संख्या कमी झाली आहे. मराठवाड्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने येथे आणखी परिस्थिती बिकट आहे. जर आणखी महिनाभरात पावसाने सरासरी गाठली नाही, तर बांधकाम उद्योगासाठी येता काळ कठीण राहील.
विजय जैस्वाल
उपाध्यक्ष जिल्हा व्यापारी महासंघ
सिमेंटची विक्री २० हजार टनाने घटली
मार्चपर्यंत सरकारी कामे जोरात सुरूअसल्याने त्या काळात सिमेंटच्या किमतीने उच्चांक गाठला होता. आजघडीला देशात काही भागात पूरपरिस्थिती व काही भागात दुष्काळ असल्याने या दोन्हींचा परिणाम सिमेंट विक्रीवर झाला आहे. औरंगाबादचा विचार केल्यास महिन्याकाठी २० हजार टनाने सिमेंटची मागणी घटली आहे.
मनोज रुणवाल
अध्यक्ष औरंगाबाद सिमेंट डीलर्स असोसिएशन