सतीश चव्हाण यांच्या सत्कार समारंभात गाजली मंत्रिपदाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:04 AM2021-01-17T04:04:26+5:302021-01-17T04:04:26+5:30

औरंगाबाद : विजयाची हॅट्‌ट्रिक साधल्याबद्दल आमदार सतीश चव्हाण यांचा शनिवारी सायंकाळी एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. ...

Demand for Gajli ministerial post at Satish Chavan's felicitation ceremony | सतीश चव्हाण यांच्या सत्कार समारंभात गाजली मंत्रिपदाची मागणी

सतीश चव्हाण यांच्या सत्कार समारंभात गाजली मंत्रिपदाची मागणी

googlenewsNext

औरंगाबाद : विजयाची हॅट्‌ट्रिक साधल्याबद्दल आमदार सतीश चव्हाण यांचा शनिवारी सायंकाळी एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी करण्यात आलेली मंत्रिपदाची मागणी चांगलीच गाजली. त्यावरून अनेक विनोदी किस्सेही रंगले, हास्याचे फवारेही उडाले व सतीश चव्हाण आणि विक्रम काळे यांना मंत्री करा, ही मागणी शरद पवार, अजितदादा आणि जयंत पाटील यांच्या कानावर घालते, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांना द्यावे लागले.

शरद पवार यांना वस्तुस्थितीसह अजितदादांना थेट आणि जयंत पाटील यांना जरा पाल्हाळिक पद्धतीने मी ही गोष्ट सांगेन. या दोघांना शिक्षणमंत्री व्हायचं असेल तर त्यात तांत्रिक अडचण आहे. हे खातं कॉंग्रेसकडे आहे, पण त्यातूनही कसा मार्ग काढायचा हे आपण पाहू, असे उद्गार सुळे यांनी काढल्यामुळे अपेक्षा न उंचावल्यास नवलच.

प्रास्ताविक करताना निमंत्रक राजेश करपे यांनी, विजयाची हॅट्‌ट्रिक साधल्याबद्दल सतीश चव्हाण यांचा सत्कार होतोय, पण आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकण्याची गरज आहे, असे सूचक उद्गार काढले.

हा धागा पकडून शिक्षक आ. विक्रम काळे यांनी स्पष्ट केले की, करपे हे शिक्षक आहेत. ते भीत भीतच बोलले. त्यांना ते मांडता आले नाही. पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर भाजपने जसे नितीन गडकरी व चंद्रकांत पाटील यांना मंत्री केले, तसे सतीशभाऊंना किंवा मला राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्री केले पाहिजे, असे करपे यांना म्हणावयाचे होते.(हशा आणि टाळ्या) पाहिजे तर सतीशभाऊंना मंत्री करा. मी मागे हटायला तयार आहे. संधीच द्यायची झाली, तर अडीच वर्षे आम्हाला मंत्री करा.(पुन्हा हंशा)

सत्काराला उत्तर देताना सतीश चव्हाण यांनी मात्र सावध वक्तव्ये केली. मी शरद पवार आणि दिवंगत वसंतराव काळे यांच्या विचारांचा वारसदार आहे. माझा विजय हा यांच्या विचारांचाच विजय असून, या मतदारसंघातही बहुजनांचा विजय होऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे. राहिला प्रश्न मंत्रिपदाचा. शरद पवार यांच्याकडे मागून काही मिळेल असे नाही आणि न मागता भरपूर काही मिळाल्याशिवाय राहत नाही. मंत्री करायचेच असेल तर विक्रम काळे यांना करा आणि तेही शिक्षणमंत्री करा. (हशा व टाळ्या)

या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ प्रमोद येवले होते. मंचावर एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, सतीश चव्हाण यांच्या पत्नी आशा चव्हाण, जयसिंगराव गायकवाड, कैलास पाटील यांच्यासह विद्यापीठाचे सिनेट सदस्य उपस्थित होते. प्रारंभी महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. प्रा. डॉ. प्रतिभा अहिरे यांनी मानपत्राचे वाचन केले. ते संजय शिंदे आणि राजानंद सुरडकर यांनी लिहिले होते. प्रा. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट

पाच नगरसेवक सतीशभाऊंनी दिले..

मला महापौर होण्यासाठी पाच नगरसेवक कमी पडत होते. ते सतीश चव्हाण यांनी दिले, असा गौप्यस्फोट नंदकुमार घोडेले यांनी यावेळी केला. त्यावर राष्ट्रवादीचे चार नगरसेवक निवडून आले होते. हा पाचवा कुठून आला, असा सवाल सतीश चव्हाण यांनी त्यांच्या भाषणात केला. हा धागा पकडून सुप्रिया सुळे म्हणाल्या, यालाच तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतात.(हंशा आणि टाळ्या)

Web Title: Demand for Gajli ministerial post at Satish Chavan's felicitation ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.