मागणी अन् दरही वाढल्याने शेतकऱ्यांची ज्वारीला पसंती; हरभऱ्याचे पीक मोडून केली पेरणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2024 05:13 PM2024-01-27T17:13:26+5:302024-01-27T17:14:08+5:30
पिकाचे क्षेत्र वाढले ; कृषी विभागानेही केली जनजागृती
- दिलीप मिसाळ
गल्लेबोरगाव ( छत्रपती संभाजीनगर) : खुलताबाद तालुक्यातील वेरूळ महसूल मंडळात रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे पीक मोडून ज्वारीची पेरणी केली आहे. त्यामुळे ज्वारीच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे.
खुलताबाद तालुक्यात पाच कृषी मंडळे आहेत. तालुक्याचे भोगौलिक क्षेत्र १३ हजार १९० हेक्टर असून त्यापैकी फक्त ६ हजार १७१ हेक्टर क्षेत्र लागवडीयोग्य आहे. तालुक्यात रब्बी हंगामात ४ हजार ३३९ हेक्टरवर पिकांची लागवड झाल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली आहे. त्यात वेरूळ कृषी मंडळांत रब्बी हंगामात ८२७ हेक्टरवर गव्हाची लागवड करण्यात आली असून १०८ हेक्टरवर हरभरा लागवड करण्यात आली आहे. कांदा १९५ हेक्टर, मका ५५१ हेक्टर आणि ज्वारी १ हजार ५६२ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. काही क्षेत्रावर भाजीपाला व फळांची लागवड करण्यात आली आहे. ज्वारी हे रब्बी हंगामातील मुख्य पीक असून उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. आता ज्वारीची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच, ज्वारीला भाव देखील बाजारात चांगला मिळत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील उत्पादक शेतकरी ज्वारीच्या लागवडीला प्राधान्य देत आहेत. शासन देखील ज्वारी पेरणीला प्राधान्य देत असून ज्वारीमध्ये तांदळापेक्षा प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ज्वारी खाण्यावर नागरिकांचा भर वाढल्याचे दिसत आहे.
जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयोग
पोषक धान्याबरोबरच ज्वारी पिकाचा कडबा म्हणून जनावरांना वैरणसाठी उपयोग होतो. उन्हाळ्यामध्ये नेहमीच पशुपालकांना चाराटंचाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे चाऱ्याची व्यवस्था व्हावी, याकरिता अनेक शेतकरी ज्वारीची पेरणी करतात. दुभत्या जनावरांनाही हा कडबा उपयुक्त असल्याने शेतकरी दुहेरी फायदा लक्षात घेऊन ज्वारीची लागवड अधिक करीत असल्याने जाणकारांनी सांगितले.
वेगवेगळ्या वाणाची लागवड करा
शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात उत्पादनात वाढ व गुरांना चारा या सर्व बाबींचा विचार करता ज्वारी पिकाची लागवड करण्यावर भर द्यायला हवा. मात्र, एकाच संकरित वाणाची लागवड न करता वेगवेगळ्या कंपनीच्या संकरीत वाणाची लागवड करणे गरजेचे आहे.
- गंगाराम मुंडे, मंडळ कृषी अधिकारी, वेरूळ