मुलाच्या वाढदिवसासाठी कार्यकारी अभियंत्याकडे १० हजारांची मागणी, नकार देताच केली मारहाण
By राम शिनगारे | Published: January 19, 2023 07:36 PM2023-01-19T19:36:02+5:302023-01-19T19:37:12+5:30
रेकॉर्डवरील आरोपीचे कृत्य : वेदांतनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता अशोक येरेकर हे कार्यालयात काम करताना रेकॉर्डवरील आरोपी सोनेश चंद्रकांत बनसोडे (३०, रा. राहुलनगर, गल्ली नं. ४) याने ‘माझ्या मुलाचा वाढदिवस आहे, मला दहा हजार रुपये दे,’ असे म्हणत मारहाण केली. टेबलवरील शासकीय कागदपत्रेही फेकून दिली. हा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागात बुधवारी सायंकाळी ६ वाजता घडला. या प्रकरणात गुन्हा नोंदविल्यानंतर आरोपीस वेदांतनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली.
कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी दुपारी साडेतीन वाजता त्यांना एका मोबाइलवरून फोन आला, त्यावर ‘मी तुझ्याकडे दोन-तीन वेळा तक्रार केली आहे. तू त्या तक्रारीवर काय केलेस,’ अशी विचारणा केली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता सोनेश बनसोडे हा लहान बाळासह एका व्यक्तीला घेऊन कार्यालयात आला. तेव्हा शासकीय कामकाजाची सर्व कागदपत्रे फेकून देत बनसोडे याने ‘माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. मला दहा हजार रुपये दे, तुला जास्त मस्ती आली का, आशक्या मला पैसे दे, नाहीतर तू येथे ड्यूटी कशी करतो तेच मी बघतो,’ असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर मारहाणही करण्यात आली.
टेबलवरील अशोकस्तंभ उचलून आपल्या दिशेने मारण्यास धावून येत असतानाच कार्यालयातील कर्मचारी शैलेश चव्हाण यांनी त्याच्याकडून अशोकस्तंभ हिसकावून घेतला. त्यानंतर बनसोडे यास बाजूला घेऊन बोलण्यात व्यस्त करून पोलिसांच्या ११२ नंबरवर माहिती देत मदत मागितली. वेदांतनगर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपी सोनेश बनसोडे यास ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात येरेकर यांच्या तक्रारीवरून बनसोडे याच्या विरोधात शासकीय कामकाजात अडथळ्यासह खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक प्रमोद देवकाते करीत आहेत.
आरोपीस पोलिस कोठडी
वेदांतनगर पोलिसांनी आरोपीस अटक केल्यानंतर गुरुवारी न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायाधीशांनी एक दिवसाची पोलिस कोठडी त्यास मंजूर केली. आरोपी बनसोडे याच्या विरोधात क्रांती चौक, मुकुंदवाडी, रेल्वे व करमाड या ठिकाणी सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती निरीक्षक गिरी यांनी दिली.