औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 01:30 PM2020-08-18T13:30:35+5:302020-08-18T13:34:03+5:30

बैठकीत सर्वांनीच संघटनात्मक फेरबदलाची जोरदार मागणी केल्याने बैठकीचा मूळ मुद्दा भरकटला. 

Demand for organizational reshuffle in Aurangabad District Shiv Sena | औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल करण्याची मागणी

औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल करण्याची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाप्रमुखपदापासून सर्वच पदांवरील पदाधिकारी बदलले गेले पाहिजेत. फेरबदल झाल्यास नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल

औरंगाबाद : राज्यात महाआघाडीचे सरकार येऊन ९ महिन्यांचा कालावधी लोटला आहे, तरी विविध शासकीय समित्या, महामंडळांवर नियुक्त्या न झाल्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या जागांवर लवकर नियुक्त्या व्हाव्यात यासाठी रविवारी एक बैठक पार पडली. संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वांनीच संघटनात्मक फेरबदलाची जोरदार मागणी केल्याने बैठकीचा मूळ मुद्दा भरकटला. 

जिल्हाप्रमुखपदासह सगळेच संघटनात्मक बदल करण्यात यावेत, अशी मागणी माझ्यासह सर्वांनी लावून धरली, असे आ. संजय शिरसाट यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अनेक महत्त्वाच्या पदांवर वर्षानुवर्षे तीच माणसे आहेत, त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी सर्वानुमते पुढे आली. याबाबत संपर्कप्रमुख घोसाळकर यांनी मागणी पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असा शब्द दिल्याची माहिती मिळाली. 

राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांना महामंडळ, अशासकीय समिती सदस्य होण्याचे वेध लागले; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काही रखडले. महाविकास आघाडीच्या सरकारमधील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांसाठी याद्या तयार झाल्या असून, शिवसेना मागे पडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याचे संपर्कप्रमुख घोसाळकर यांना बैठक घेऊन याद्या तयार करण्याबाबत सूचना देण्यासाठी पाठविले होते. आमदार, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुखांनी समित्यांसाठी सदस्यांच्या नावाची यादी द्यावी, याबाबत घोसाळकर यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, समित्यांवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यावरून पक्षात दोन गट पडले आहेत. 

फेरबदल होणे गरजेचे 
मी स्वत: मागणी केली आहे, संघटनेतील सर्व पदावरील चेहरे बदलणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे तेच चेहरे आहेत. जिल्हाप्रमुखपदापासून सर्वच पदांवरील पदाधिकारी बदलले गेले पाहिजेत. फेरबदल झाल्यास नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल, असे मत माझ्यासह सर्वांनीच मांडल्याचे आ.  शिरसाट यांनी सांगितले. 
 

Web Title: Demand for organizational reshuffle in Aurangabad District Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.