घाटनांद्रामार्गे सिल्लोड-धुळे बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:05 AM2021-07-24T04:05:16+5:302021-07-24T04:05:16+5:30
घाटनांद्रा : परिसरातील प्रवाशांची काही दिवसापूर्वीची असलेली सिल्लोड-धुळे बससेवा सुरू करण्याची मागणी सिल्लोड आगाराने पूर्ण केली होती. मात्र ...
घाटनांद्रा : परिसरातील प्रवाशांची काही दिवसापूर्वीची असलेली सिल्लोड-धुळे बससेवा सुरू करण्याची मागणी सिल्लोड आगाराने पूर्ण केली होती. मात्र काही दिवसानंतर अपुऱ्या कर्मचाऱ्यांचे कारण देत ही सेवा बंद करण्यात आली. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून ही सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
घाटनांद्रा-पाचोरा रस्त्यावर सिल्लोड आगाराची सकाळची सिल्लोड-पाचोरा ही एकमेव बस असल्याने या बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होते. घाटनांद्रा हे सिल्लोड तालुक्यातील सर्वात मोठे व औरंगाबाद जिल्ह्यातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जाते. तसेच हे गाव कन्नड सोयगाव सिल्लोड या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या सीमेवर येत असल्याने या तालुक्यातील विविध गावांना जाण्यासाठी येथील बसस्थानकावर नेहमी प्रवाशांची मोठी वर्दळ असते. सकाळची सिल्लोड-पाचोरा ही बस निघून गेल्यावर एकही बस या रस्त्यावर नसल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागते किंवा जास्तीचे पैसे देऊन दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून वेळही वाया जात आहे.
यामुळे बंद केलेली सिल्लोड-धुळे ही बससेवा पुन्हा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी कन्हैया निकम, नीलेश बिसेन, शिवनाथ चौधरी, गणेश निकम, रंगनाथ मोरे, आकाश मोरे, राजू गायकवाड, शांतलिंग कोठाळे, अनिल कुलकर्णी आदींसह प्रवाशांनी केली आहे.