शाळा १ जुलैपासून सुरू करण्याची मागणी
By Admin | Published: June 13, 2014 11:58 PM2014-06-13T23:58:02+5:302014-06-14T01:20:23+5:30
जालना : शहरासह जिल्ह्यात चढत असलेला उन्हाचा पारा, भारनियमन आणि पाणी या समस्या लक्षात घेता इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळा या १ जुलैपासून सुरू
जालना : शहरासह जिल्ह्यात चढत असलेला उन्हाचा पारा, भारनियमन आणि पाणी या समस्या लक्षात घेता इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळा या १ जुलैपासून सुरू कराव्यात, किंवा अर्धवेळ कराव्यात, अशी मागणी लायन्स क्लब आॅफ जालना गोल्डच्या वतीने जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या एका निवेदनाव्दारे करण्यात आली.
सध्या शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा चढत आहे. अधूनमधून निर्माण होत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे उकाडा प्रचंड जाणवत आहे. लहानमुला-बाळांसह आबालवृद्ध हैराण आहेत. या पार्श्वभूमीवर इंग्रजी माध्यमांच्या शाळा २ आणि ९ जूनपासून सुरू झाल्या आहेत. तर मराठी माध्यमांच्या शाळा १६ जूनपासून सुरू होत आहेत.
इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना उकाडा, भारनिमयनासह पाण्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळी १० वाजेपासून कडाक्याच्या उन्हामुळे सर्वसामान्य नागरिकांनाच घराबाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे. आबालवृद्धांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. वर्गातील गर्दी, बाहेर कडक उन्ह, प्रचंड उकाडा, उष्ण वाफ यामुळे चिमुकले पुरते हैराण झालेले आहेत. परिणामी वॉटरबॅगमधील पाणी ही अपुरे पडत आहे. उष्णता, उकाडा, भारनियमनामुळे चिमुकले बेहाल झाले आहेत, असे मत या संघटनेने सादर केलेल्या निवेदनाव्दारे व्यक्त केले.
लायन्स क्लब आॅफ जालना गोल्डच्या पदाधिकारी व सदस्यांनी इंग्रजी शाळेच्या बाहेर विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर अनेक भयावह बाबी समोर आल्या आहेत, असे म्हटले.
बहुतांश शाळांमध्ये इन्व्हर्टर असूनही ते बंद किंवा वापरात नाही. विद्यार्थ्यांचे उकाड्यामुळे हैराण होत आहेत. उकाड्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणे अवघड होत आहे. उलटपक्षी प्राचार्य व मुख्याध्यापकांच्या कक्षात एसी सुरू असतात.
सर्वच शाळांमध्ये पाण्याची व्यवस्था आहे. परंतु पाणीही लवकर संपत आहे. ‘पाणी भरले होते ते संपले’, असे उत्तर विद्यार्थ्यांना मिळत आहे. पाणी संपल्याचे सांगून मुख्याध्यापक, प्राचार्य मोकळे होत असले तरी, शालेय व्यवस्थापनाकडून पाण्याची पुरेशी व्यवस्था करण्यात येत नाही. भारनियमनामुळे पंखे बंद होतात. उकाड्यामुळे शाळेत बसवले जात नाही, अशा तक्रारी विद्यार्थी पालकांकडे करत असल्याचे शिष्टमंडळाने म्हटले.
ही बाब विचारात घेऊन उन्हाळी सुट्या १ जुलैपर्यंत पुढे ढकलाव्यात किंवा अर्धावेळ शाळा कराव्यात, इंग्रजी माध्यमांच्या शाळा १ जुलैपर्यंत बंद ठेवाव्यात, अशी मागणी क्लबचे अध्यक्ष सुभाष देविदान, विजय कागलीवाल, नंदकिशोर गोयल, रामकुंवर अग्रवाल, पंकज गेल्डा, मोहन गुप्ता आदींसह पदाधिकारी व सदस्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांचे बेहाल
उन्हामुळे चक्कर येऊन पडण्याचे प्रकार वाढले आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. तेथील पाणी, भारनियमनाच्या समस्या पाहता विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याबाबत सकारात्मक विचार व्हावा, असेही निवेदनात म्हटले आहे.