मागणी कोहळ्याची बोळवण आवळ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:02 AM2021-07-21T04:02:27+5:302021-07-21T04:02:27+5:30
जयेश निरपळ गंगापूर : लोकसंख्येच्या मागणीप्रमाणे गंगापूर तालुक्यासाठी ७ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३७ उपकेंद्रांची गरज असून तशी मागणीही ...
जयेश निरपळ
गंगापूर : लोकसंख्येच्या मागणीप्रमाणे गंगापूर तालुक्यासाठी ७ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३७ उपकेंद्रांची गरज असून तशी मागणीही केली आहे; मात्र शासनाने केवळ २ प्राथमिक व ९ उपकेंद्रांसाठीच प्रस्ताव मागवून तालुक्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत किमान आरोग्य सुविधा पोहोचविण्याच्या उद्देशाने प्रा.आ. केंद्रांचे जाळे विणण्यात आले आहे; मात्र अपुऱ्या आरोग्य केंद्रामुळे तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ४ लाख लोकसंख्येचा भार सध्या केवळ ६ प्रा.आ. केंद्रावर आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील गंगापूर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण होते. यासह कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणसुद्धा या ठिकाणी अधिक होते, औद्योगिक वसाहतीचा वाढता विस्तार लक्षात घेता, तालुक्यासाठी रांजणगाव (शेपू.) येथे ३, जामगाव, डोणगाव, जोगेश्वरी येथे प्रत्येकी एक याप्रमाणे २ लक्ष ५१ हजार लोकसंख्येसाठी एकूण ७ नवीन प्रा.आ. केंद्र व ३७ उपकेंद्राची मागणी तालुका आरोग्य कार्यालयाकडून करण्यात आली होती. त्यात केवळ जामगाव व जोगेश्वरी या २ प्रा.आ.केंद्र व ९ उपकेंद्रांचे प्रस्ताव शासनाने मागवून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. नियमानुसार ३० हजार लोकसंख्येमागे एक प्रा.आ.केंद्र व ५ हजार लोकसंख्येसाठी एक उपकेंद्र गरजेचे आहे. लोकसंख्येच्या ४५ टक्के लोक हे वाळूज रांजणगाव औद्योगिक परिसरात राहत असून येथे ४ प्रा.आ. केंद्रांची गरज असताना जोगेश्वरी या एका केंद्रासाठीच प्रस्ताव मागण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. आरोग्य केंद्रे वैद्यकीय उपचार, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबवणे, आरोग्यशिक्षण देणे आदी महत्त्वाची कामे करतात. शिवाय कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपवण्यासाठी व लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याकरिता आरोग्य केंद्राचे जाळे मजबूत असणे गरजेचे असताना केवळ शासनाच्या उदासीन धोरणामुळे तालुक्यातील शेवटच्या व्यक्तीला आरोग्य सुविधांचा लाभ कसा मिळेल हा प्रश्न अनुत्तरित आहे.
कोट..
३७ उपकेंद्र व ७ केंद्रांची मागणी केली होती, त्यापैकी शासनाने २ केंद्र व ९ उपकेंद्रांचे प्रस्ताव मागविले आहे. कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया गतिमान होईल.
-विवेक कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी
कोट...
पहिल्या टप्प्यात मागणी केलेल्या दोन आरोग्य केंद्राला मान्यता मिळाली असून, उर्वरित पाच प्रा.आ. केंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
संतोष माने, अध्यक्ष, खादी ग्रामोद्योग महामंडळ, औरंगाबाद