सिल्लोड तालुक्यात मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:05 AM2021-03-16T04:05:36+5:302021-03-16T04:05:36+5:30
गेल्यावर्षी सिल्लोड तालुक्यात मक्याचे शासकीय भराड केंद्र सुरू झाले होते. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल मका या ठिकाणी खरेदी ...
गेल्यावर्षी सिल्लोड तालुक्यात मक्याचे शासकीय भराड केंद्र सुरू झाले होते. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा हजारो क्विंटल मका या ठिकाणी खरेदी करण्यात आला. त्याचा शेतकऱ्यांना फायदाही झाला. मात्र, येथील मका खरेदी केंद्र अद्यापही सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची मका खरेदी थांबली आहे. पैशाची गरज असल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे जातात. परंतु या ठिकाणी मालाला मातीमोल किंमत मिळू लागली आहे.
एकीकडे मक्याचे भाव १८५० रुपये असताना, दुसरीकडे व्यापारी सुपर मका प्रति क्विंटल १३०० रुपयांनी खरेदी करीत असल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकऱ्यांना प्रति क्विंटलमागे ५५० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे सिल्लोड येथे हमीभावाने मका खरेदी करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यासंदर्भात सिल्लोड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रमेश साळवे यांनी सांगितले की, शासनाकडून यावर्षीचा मका खरेदी करण्याचे आदेश अजून आलेले नाहीत. आदेश प्राप्त होताच शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल.