घाटनांद्रामार्गे सिल्लोड-धुळे बससेवा सुरू करण्याची मागणी
By | Published: December 2, 2020 04:10 AM2020-12-02T04:10:03+5:302020-12-02T04:10:03+5:30
घाटनांद्रा गाव हे कन्नड, सोयगाव, सिल्लोड या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या सीमेवर येत असल्याने या तालुक्यातील विविध गावांना जाण्यासाठी ...
घाटनांद्रा गाव हे कन्नड, सोयगाव, सिल्लोड या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या सीमेवर येत असल्याने या तालुक्यातील विविध गावांना जाण्यासाठी येथील बसस्थानकावर प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. सकाळची ८.३० वाजेची सिल्लोड-पाचोरा बस निघून गेल्यावर तब्बल चार तासांनंतर १२.३० वाजता सिल्लोड-पाचोरा बस आहे. त्याआधी एकही बस या रस्त्यावर नसल्याने प्रवाशांना ४ तास ताटकळत बसावे लागते किंवा जास्तीचे पैसे देऊन दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागतो. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, वेळही वाया जात आहे. सिल्लोड-धुळे हा पल्ला खूप लांब असल्याने ही बस प्रवाशांना खूप सोयीची पडते. धुळ्याहून पुढे सुरत, नाशिक, गुजरात, राजस्थान, मुंबई आदी ठिकाणी जाण्यासाठीदेखील ही बस सोयीची आहे. सकाळची सिल्लोड-पाचोरा ही एकमेव बस या रस्त्यावर सुरू असल्याने या बसला प्रवाशांची गर्दी राहत आहे. आता सर्वच ठिकाणचे रस्तेही सुरळीत झाल्याने या मार्गावरील बंद केलेल्या बस आगाराने पुन्हा पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी नीलेश बिसेन, शिवनाथ चौधरी, गणेश निकम, रंगनाथ मोरे, आकाश मोरे आदींसह नागरिकांनी केली आहे.