इन्स्टाग्रामवर बदनामी करत मुलीकडे २ लाखांची मागणी; उत्तरप्रदेशचा खंडणीखोर सोलापुरातून अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 07:06 PM2022-01-13T19:06:59+5:302022-01-13T19:09:24+5:30
सोशल मिडियावर बनावट आयडीद्वारे खंडणी मागणारा मुळचा उत्तरप्रदेशाचा आहे
औरंगाबाद : इन्स्टाग्रावर बनावट आयडी तयार करुन मुलीची बदनामी करीत दोन लाख रुपयांची खंडणार मागणाऱ्या आरोपीस सिटी चौक पोलिसांनी सोलापूर येथून ताब्यात घेतले आहे. त्यास अटक करुन न्यायालयात हजर केले असता, १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.
सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीसोबत बनावट अकाऊंटच्या माध्यमातुन मैत्री करीत तिच्या घरातील सर्वाचे माेबाईन नंबर घेतले. तसेच तिचे छायाचित्रही मिळवले. हे छायाचित्र मॉर्फिंग करून अश्लिल बनवले. त्यानंतर इन्स्टाग्रामवर बनावट खाते तयार करुन त्यावर हे छायाचित्र प्रोफाईल म्हणून ठेवले होते. हे छायाचित्र हटविण्यासाठी आरोपी अरवाज खान रिजवान खान (वय २५, रा. इदगाह रोड अलाहपुर, ता. दातागंज. जि. बदायु. उत्तरप्रदेश) याने दोन लाख रुपयांची खंडणी मागितली.
या प्रकारामुळे घाबरलेल्या कुटुंबातील सदस्यांनी पोलिसात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक अशोक गिरी यांनी गुन्हा दाखल करुन तपास दुय्यम निरीक्षक अशोक भंडारे यांच्याकडे दिला होता. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतल्यानंतर अरवाज खान हा सोलापूर जिल्ह्यात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सिटी चौकचे संजय नाईक,संदीप तायडे आणि अभिजीत गायकवाड यांच्या पथकाने आदित्यराज साखर कारखाना ( जवळगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर ) येथे पोहचत स्थानिक पोलिसांच्या मदतीने अरवाजच्या मुसक्या आवळल्या. त्यास पकडून औरंगाबादेत आणून बुधवारी अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता, त्यास १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अधिक तपास निरीक्षक अशोक भंडारे, हवालदार सय्यद शकील करीत आहेत.