भारतीय संविधानामुळेच लोकशाही सक्षम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:04 AM2021-05-23T04:04:37+5:302021-05-23T04:04:37+5:30
औरंगाबाद : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप विचारपूर्वक संविधानात काही मौलिक तरतुदी केल्या आहेत. विशेषतः लोकशाहीच्या ...
औरंगाबाद : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप विचारपूर्वक संविधानात काही मौलिक तरतुदी केल्या आहेत. विशेषतः लोकशाहीच्या स्तंभाबद्दल अत्यंत सजगपणे ‘चेक्स ॲण्ड बॅलन्स’ पद्धतीने अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे सत्तर वर्षांनंतरही आपली लोकशाही सक्षमपणे काम करत आहे, असे प्रतिपादन माजी माहिती संचालक अजय अंबेकर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमतज्ज्ञ अजय अंबेकर व ज्योती अंबेकर यांचे शनिवारी ‘प्रशासकीय व संवाद कौशल्ये’ या विषयावर ऑनलाइन संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जनसंवादतज्ज्ञ अजय अंबेकर यांनी ‘पब्लिक अॅण्ड गुड गव्हर्नन्स’ या विषयावर, तर प्रख्यात निवेदिका ज्योती अंबेकर यांनी ‘प्रभावी संवादासाठी कौशल्ये’ या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्योती अंबेकर म्हणाल्या, बारा कोसावर भाषा बदलते म्हणतात, प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो. आपण तो जतन करून ठेवला पाहिजे. प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी प्रत्येकाने आपला आवाज, उच्चार, सादरीकरण या साऱ्याचा रियाज केला पाहिजे.
अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, मनुष्य हा आयुष्यभर काही ना काही शिकत असतो. अनुभवातून, ज्ञानातून तो शिकतो आणि स्वतःमध्ये बदल करून घेतो व त्यातूनच त्याचे व्यक्तिमत्त्व घडत असते.
या कार्यक्रमात प्लेसमेंट ऑफिसर डॉ. गिरीश काळे यांनी बासरीवादन केले. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. प्रतिभा अहिरे यांच्यासह प्राध्यापक, अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.