ई-पोर्टलच्या विरोधात औषध विक्रेत्यांचा मूकमोर्चा
By Admin | Published: May 31, 2017 12:32 AM2017-05-31T00:32:44+5:302017-05-31T00:35:53+5:30
लातूर : देशभरासह राज्यात बेकायदेशीर इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून आॅनलाईन औषध विक्री आणि ई-पोर्टलच्या विरोधात लातूर जिल्ह्यातील जवळपास १ हजार ५०० औषधी विक्रेत्यांनी मंगळवारी बंद पुकारला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : देशभरासह राज्यात बेकायदेशीर इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून आॅनलाईन औषध विक्री आणि ई-पोर्टलच्या विरोधात लातूर जिल्ह्यातील जवळपास १ हजार ५०० औषधी विक्रेत्यांनी मंगळवारी बंद पुकारला होता. लातुरात जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोशिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारने तातडीने घेतलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त प्रवीण पवार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने जी अद्ययावत सुविधा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत, त्याचा अधिकृत शासकीय मसुदा झालेला नसतानाही त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचा घाट घातला जात आहे. ई-पोर्टलच्या माध्यम, आतून सर्व औषधींचे प्रिस्क्रिप्शन त्यावर नोंदविणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीत ग्रामीण भागात इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे असे नाही. त्याचप्रमाणे सर्वच औषधी दुकानांमध्ये संगणकाची सोय असेलही असे नाही. परिणामी, या ई-पोर्टलला विरोध करण्यासाठी लातूर जिल्हा केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी सकाळी मूकमोर्चा काढण्यात आला. यावेळी केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष चापसी, ईश्वर बाहेती, नागेश स्वामी, राजकुमार राजारुपे, अरुण सोमाणी, भांगडिया, अतुल कोटलवार, प्रकाश रेड्डी, मनोज अगाशे, अंकुश काकडे आदी उपस्थित होते.